रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सध्या सुरु आहे. मात्र, सध्या काही ठिकाणी आहे त्या रस्त्याची स्थिती गंभीर आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामं होणं आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदूर्गचे खासदार विनायक राऊत यांनी या महामार्गाच्या सद्यस्थितीबाबत आज (सोमवार) आढावा घेतला.
मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था दैनीय.. ठेकेदार बदलण्याच्या विनायक राऊत यांच्या सूचना - Vinayak Raut on highway
रत्नागिरी-सिंधुदूर्गचे खासदार विनायक राऊत यांनी आज मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं कामाचा आढावा घेतला.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या महामार्गावरील खड्डे व कामांची स्थिती व आरवली ते कापसाळ(चिपळूण) दरम्यान खड्ड्यांची गंभीर स्थिती आहे. त्यामुळे पहिला ठेकेदार बदलून दुसऱ्या ठेकेदाराची नियुक्ती केली जावी, अशा सूचना खासदार विनायक राऊत यांनी केल्या आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते बावनदी दरम्यानचा महामार्ग अत्यंत खराब झाला आहे. या खराब रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर करण्याच्या सूचना येथील अधिकारीवर्गाला केल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर आरवली ते चिपळूणमधील कापसाळ दरम्यानच्या महामार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. प्रचंड मोठे खड्डे पडलेले आहेत. या मार्गाची दुरूस्ती करण्यास नियुक्त केलेला ठेकेदार निष्क्रिय ठरला आहे. त्यामुळे संबधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. त्या ठेकेदाराच्या जागी दुसरा ठेकेदार नेमून हा खराब झालेला रस्ता सुस्थितीत आणण्यासाठी कार्यवाही केली जावी, अशा सक्त सूचना राऊत यांनी दिल्या आहेत. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या महामार्गाच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना खासदार राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.