रत्नागिरी - रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा यासाठी आता ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला आहे. नाटे ग्रामपंचायतीचा ठराव करून थेट मुख्यमंत्र्यांना साकडं घालण्यात आले आहे. आयलॉग जेटीसाठी प्रस्तावित सुमारे दीड हजार एकर आणि परिसरातील जागा घेऊन त्या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प उभारावा अशी मागणी नाटे ग्रामपंचायतीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्याबाबतचा ठराव देखील नाटे ग्रामपंचायतीमध्ये संमत करण्यात आला आहे.
रिफायनरी प्रकल्पाला सध्या मोठ्या प्रमाणात समर्थन वाढत आहे. विरोधाची धारही हल्ली कमी होत आहे. त्यातच या प्रकल्पासाठी ग्रामपंचायती देखील पुढाकार घेऊ लागल्या आहेत. नाटे ग्रामपंचायतीने याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.
हेही वाचा -फुंकल्यावर नाही, तर चक्क गोल फिरवल्यावर वाजते ही जादूची बासरी!
मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र नाणार, विलये, गोठीवारे येथे येऊ पाहणाऱ्या रिफायनरी सदृश्य प्रकल्पाची यथोचित माहिती संपूर्ण राजापूरवासीयांना काही वर्षात झालेली आहे. नाणार, विलये, गोठीवारे येथील रिफायनरीकरिता जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द झालेली असून आता शासनाद्वारे सदर प्रकल्प प्रस्तावित नाही. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते की, जेथे स्थानिक जनता हा प्रकल्प मागेल तेथे तो करण्यात येईल. त्याला अनुसरून माझ्या गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच/सदस्य या नात्याने तालुक्याच्या उन्नत्तीला हातभार लावणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी माफक ठरणाऱ्या या प्रकल्पाचे स्वागत करतो. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, नाटे येथे यापूर्वी आयलॉग जेटीसाठी १५०० एकर क्षेत्र उपलब्ध आहे. त्याच्या आजूबाजूचा परिसर रिफायनरीकरिता आवश्यक ते क्षेत्र नजिकच्या गावामधून प्रस्तावित करावे. राजापूर तालुक्यात ग्रीन रिफायनरी प्रकल्प व्हावा. त्यासाठी नाटे ग्रामपंचायतीचे पूर्ण सहकार्य राहील. मी सरपंच/ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामीण जनतेचा प्रतिनिधी म्हणून रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करून नाटे पंचक्रोशीत स्वागत करतो. अशी विनंती नाटेच्या सरपंचांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
हेही वाचा -महाराष्ट्र लसीकरणात देशात अव्वल; आजपर्यंत 62 लाख 9 हजार 337 लाभार्थ्यांचे लसीकरण
ठरावात काय?
"राजापूर तालुका हा डोंगराळ भाग व मागास भाग असून येथील तरुण वर्गाला रोजगार नसल्यामुळे नोकरीनिमित्त मुंबईला जातात. राजापूर तालुक्यात ग्रीन रिफायनरी प्रकल्प झाला तर विकासाला चालना मिळेल. तसेच येथील तरुणांसाठी रोजगार निर्माण होईल. त्यासाठी जेटी तयार करण्यासाठी नाटे समुद्रकिनारी होण्यासाठी लागणारी जागा उपलब्ध होईल. ग्रामपंचायत नाटे येथे प्रकल्प व्हावा, असा एकमताने ठराव करण्यात आला", असं ठरावात म्हटलं आहे.