रत्नागिरी -चिपळूण तालुक्यातील खांदाटपाली येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करत हा परिसर बंद केला आहे. संपूर्ण खांदाटपाली गाव कंटेन्टमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. गावामधील व्यक्तींना गावाबाहेर येण्यास व गावाबाहेरील व्यक्तीला गावामध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
खांदाटपाली गावामध्ये २४ तास नाकाबंदीकरीता २ पोलीस अधिकारी व २१ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी तत्काळ खांदाटपाली गावास भेट देऊन नेमण्यात आलेला बंदोबस्त व गावातील परिस्थितीची पाहणी केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता गावातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे.
मुंबई काळाचौकी येथील रहीवासी असलेला जे. जे. रुग्णालयात वैदयकिय उपचार घेऊन २३ एप्रिलला सायंकाळी साडेसातला चिपळूण खांदाटपालीमध्ये एक व्यक्ती इतर २ व्यक्तिसमवेत आला होता. त्यानंतर दिनांक २४ एप्रिलला कामथे कुटीर रुग्णालय याठिकाणी तपासणी करून दिनांक २५ एप्रिलला हा व्यक्ती पेढांबे (ता. चिपळूण) येथील विलगीकरण कक्षामध्ये दाखल झाला. पुणे, मुंबई आणि इतर ठिकाणाहून रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तीची चाचणी केली असता, पॉझिटिव्ह आली.