रत्नागिरी - कोकणातील सर्वांत मोठा श्रद्धेचा आणि परंपरेचा सण म्हणून शिमगोत्सवाकडे पाहिले जाते. होळी सणाला कोकणात पेटणाऱ्या होमांची वेगवेगळ्या प्रथा पहायला मिळतात. रत्नागिरी जवळच्या शिरगाव शिवरेवाडीत अशीच पेटत्या होमातून नारळ काढण्याची परंपरा आजही कायम आहे.
होळीची अनोखी प्रथा; पेटत्या होमातून बाहेर काढले जातात नारळ - शिरगाव
रत्नागिरी जवळच्या शिरगाव शिवरेवाडी यागावात पेटत्या होमातून नारळ काढण्याची परंपरा आजही कायम आहे.
शिरगावात पोर्णिमेच्या नंतर दुपारी होम पेटतो. मात्र, यासाठी गावातून चिवे म्हणजे बांबूची होळी ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत गावाच्या एका शेतात आणली जाते. होळी उभी करण्यासाठी जमिनीत कुठला खड्डा काढला जात नाही. तर गवताच्या भाऱ्या आणि पालापाचोळा आजूबाजूला पसरवून होळीचा होम केला जातो. होम पेटल्यानंतर त्यात गावातील प्रत्येक घरटी एक माणूस नवसाचा नारळ टाकतो. गेली अनेक वर्षे ही परंपरा येथे कायम आहे.
होम पेटल्यानंतर गावकरी पेटत्या होमातून नारळ बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतात. गावातील तरुण आणि बालगोपाळ ही थरारक प्रथा फक्त होळी सणाला जोपासतात. कुणी १ नारळ तर कुणी ३ नारळ या पेटत्या होमातून सहज बाहेर काढतो. पेटत्या होमाच्या १० ते २० फुटांपर्यत या होमाची झळ लागत असते. मात्र, अशा परिस्थितीत होळी सणातील पेटत्या होमातून नारळ काढण्याची परंपरा आजही या गावात सुरू आहे. हा थरार पाहण्यासाठी अनेक माहेरवाशीण आणि चाकरमानी गावात हजेरी लावत असतात.