रत्नागिरी- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड येथील मालमत्तेचा आता लिलाव होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके हे दाऊद इब्राहिमचे गाव आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई येथील दाऊदच्या बहिणीच्या फ्लॅटचा 1 कोटी 80 लाख रूपयांना लिलाव झाला होता. त्यातच आता दाऊदच्या मुंबईसह खेड येथील मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे. अँटी स्मगलिंग एजन्सीद्वारे हा लिलाव केला जाणार आहे.
दाऊदच्या खेड येथील तीन मालमत्तांमध्ये एक तीन मजली बंगला आहे. दाऊद या बंगल्यात अनेक वेळा येऊन राहत असल्याचे बोलले जाते. या मालमत्तांमध्ये एक पेट्रोलपंपासोबत एक फ्लॅटदेखील आहे. पुण्यातील मुल्यनिर्धारण अधिकाऱ्यांना या मालमत्तांची किंमत ठरवण्यास अँटी स्मगलिंग एजन्सीने सांगितले आहे. खेडमधील मुख्य मालमत्ता ही दाऊदची बहीण हसीनाच्या नावे आहे. तर इतर मालमत्ता दाऊदची आई अमीना बीच्या नावे आहे.