रत्नागिरी -उमेद अभियानातील पदभरती कायम ठेवावी, त्यांची पुनर्नियुक्ती करावी व ही पदभरती बाह्य यंत्रणेकडून करण्यात येऊ नये, अशा मागण्यांंसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ‘उमेद'चे सर्व कंत्राटी अधिकारी, कर्मचारी सोमवारी रस्त्यावर उतरले. शासनाकडून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद) अभियानांतर्गत कर्मचारी, कंत्राटी अधिकारी यांच्या पुनर्नियुक्ती थांबविण्यात आले आहेत. त्याविरोधात हे कर्मचारी रस्त्यावर उतरले. त्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
उमेद अभियानातील पदभरती कायम ठेवणे, त्यांच्या पुनर्नियुक्ती करणे, ही पदभरती बाह्य यंत्रणेकडून करण्यात येऊ नये, 58 वयापर्यंत रोजगाराची हमी मिळावी, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजना लागू करावी, मागणी व सोयीनुसार बदली मिळावी, अशा मागण्या उमेदच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून शासनाकडे करण्यात आल्या असून याबाबतचे निवेदन रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.
संपूर्ण रत्नागिरी जिह्यामध्ये एकूण 89 अधिकारी व कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यानुसार जिल्हा अभियान व्यवस्थापक -1, जिल्हा व्यवस्थापक -3, तालूका अभियान व्यवस्थापक -6, तालूका व्यवस्थापक 2। प्रभाग समन्वयक -32, तालुका व प्रभाग समन्वयक - सेंद्रीय शेती - 6, सहाय्यक कर्मचारी -18 असे एकूण 89 अधिकारी/कर्मचारी यांचे उमेद अभियानाला महत्वपूर्ण योगदान आहे. या अभियानातील अधिकारी व कर्मचारी यांच्या देण्यात येणाऱ्या महत्वपूर्ण योगदानातून जिह्यामध्ये एकूण सर्व प्रकारच्या समूह संसाधन व्यक्ती- 1432, एकूण स्वयंसहाय्यता समूह 16925, एकूण प्रभागसंघ 55, एकूण ग्रामसंघ - 839 या गावस्तरीय संस्थामार्पत अभियानामध्ये एकूण 186175 महिला सदस्य जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्यामध्ये क्षमता व संस्थीय बांधणी आधारे एक चांगल्या प्रकारचे संघटन निर्माण होऊन उपजीविका निर्मितीचा टण्यापर्यंत अभियान येऊन पोहोचलेले आहे. उमेद अभियानांतर्गत कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्ती थांबवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.