मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. सगळ्यांना मान्य असेल तर सरकार म्हणून करार करू असे सष्ट संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत दिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा रिफायनरी समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
नाणार रिफायनरी बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक?
रिफायनरी प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने राज्य सरकारला अल्टीमेटम दिल्याची सध्या चर्चा आहे, अशातच रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत.
रिफायनरी प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने राज्य सरकारला अल्टीमेटम दिल्याची सध्या चर्चा आहे, अशातच रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. सामनाचे कार्यकारी संपादक खासदारी संजय राऊत यांनी नुकतीच मुख्यमंत्री ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये राऊत यांनी बुलेट ट्रेन बाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिफायनरीच्याही विषयाला हात घालत या प्रकल्पाबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. या विषयावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'नाणारचा सुध्दा सरकारने करार केला होता, पण तो जनतेने हाणून पाडला. आम्ही शिवसेना म्हणून जनतेच्या सोबत उभे राहिलो, आता सरकार म्हणून सगळ्यांना मान्य असेल तर करार करू', असे सकारात्मक संकेत ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाबाबत समर्थकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.
गेली तीन वर्ष रिफायनरीचे आंदोलन कोकणात धगधगत आहे. स्थानिकांचा विरोध असल्याने शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध केला होता. या प्रकल्पाची अधिसूचनाही रद्द करण्यात आली होती. मात्र, सध्या या प्रकल्पाला समर्थन वाढत आहेत. शिवसेनेच्याच अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला समर्थन दिले आहे. त्यामुळे सध्या प्रकल्पसमर्थकांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्याचे हे विधान खूप महत्वपुर्ण मानले जात आहे. मुख्यमंत्र्यांंच्या सकारात्मकतेमुळे प्रकल्प समर्थकांना बळ मिळाले आहे.