माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर सभेत बोलताना रत्नागिरी: जिल्ह्यातील खेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. शिवसेना पक्षाच्या नाव व चिन्हावर निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतरची उद्धव ठाकरेंची ही पहिलीच जाहीर सभा होती. उद्धव ठाकरे यांनी या जाहीर सभेत निवडणूक आयोग, मुख्यमंत्री शिंदेंसह केंद्र सरकारवर टीका केली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह काढून घेतले, पण माझ्याकडून पक्ष कधीही हिरावून घेऊ शकत नाही, असे ते म्हणाले आहेत.
शिवसेना हिरावून घेऊ शकत नाहीत: उद्धव ठाकरे यांनी खेड येथील सभेत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार प्रहार केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाने आमच्याकडून पक्षाचे नाव आणि चिन्ह काढून घेतले आहे, पण तुम्ही माझ्याकडून शिवसेना हिरावून घेऊ शकत नाही. भारतीय जनता पक्ष अत्यंत क्रूरपणाने शिवसेनेला संपविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
'चुना लगाव आयोग': उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांना निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नाही. निवडणूक आयोगाला मोतीबिंदूचा त्रास होत नसेल तर त्यांनी यावे आणि जमिनीची परिस्थिती पाहावी. निवडणूक आयोग हा 'चुना लगाव' आयोग आहे आणि सत्तेत असलेल्यांचा गुलाम आहे. निवडणूक आयोगाने ज्या तत्त्वावर हा निर्णय घेतला तो निर्णय अतिशय चुकीचा आहे, असेही ते म्हणाले आहेत.
मोदींच्या नावाने मते मागा:सरदार वल्लभभाई पटेलांनी आरएसएसवर बंदी घातली, त्यांनी सरदार पटेलांचे नाव चोरले. तसेच त्यांनी सुभाषचंद्र बोस यांची चोरी केली आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतही तसेच केले. शिवसेनेच्या नावाने आणि बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोशिवाय मोदींच्या नावाने मते मागावीत, असे आव्हान मी त्यांना देतो.
अख्खा महाराष्ट्र माझे कुटुंब: उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर घेतले जात होते. महाराष्ट्रात आर्थिक गुंतवणूक येत होती. पण राज्यातले सगळे उद्योगधंदे गुजरातमध्ये पळवले जात आहे. अजून पुढील काही दिवसात कर्नाटकमधील निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील उद्योग कर्नाटकमध्ये जातील. महाराष्ट्रातील जनतेला कंगाल करून टाकायचे आणि एसटीच्या तुटलेल्या फुटलेल्या काचांना गतिमान महाराष्ट्र अशा जाहिरात लावयची. एसटी लळखळत आहे पण ती एसटी तुम्हाला लवकरच कर्नाटकमध्ये पाठवेल, असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. महाराष्ट्रातील जनतेला सांभाळण्याचे मला भाग्य लाभले. अख्खा महाराष्ट्र माझे कुटुंब आहे. आणि म्हणून माझे कुटुंब माझी जबाबदारी हा नारा मी दिला होता, असे ते म्हणाले.
तुमच्या आशिर्वादासाठी आलो आहे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून पक्षाचे नाव आणि निवडणूक धनुष्यबाण चिन्ह गमावल्यानंतर प्रथमच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे जाहीर सभेत म्हणाले की, माझ्याकडे समर्थकांना देण्यासारखे काही नाही. मी तुमचे आशीर्वाद आणि पाठिंबा घेण्यासाठी आलो आहे. तत्पूर्वी, उद्धव ठाकरेंना मोठा झटका देताना निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात शिवसेनेच्या बहुतांश आमदारांचा पाठिंबा असलेल्या शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह वाटप केले होते.
हेही वाचा: Sharad Pawar on Elections : 'काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट, डाव्या पक्षांनी एकत्रित निवडणुकीला सामोरे जावे'