रत्नागिरी :शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज खेडमधील गोळीबार मैदान येथे शिवगर्जना सभा झाली. यावेळी त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. मैदानाचे नाव चांगलय गोळीबार मैदान. ही ढेकणं चिरडायला गोळीबाराची गरज नाही. तुमचे एक बोट मतदानाच्या दिवशी यांना संपवेल. ज्यांना कुटुंबीय मानले, त्यांनीच आपल्यावर वार केले, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
शिंदेंनी केले दिल्लीत मुजरे : यावेळी शिंदे गटावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण अंधेरी जिंकलो. नाव चिन्ह नघेऊनही आपण जिंकलो. यांच्यात अनेक असे ज्यांनी बाळासाहेबांना बघितले पण नाही, ते आम्हाला बाळासाहेबांचे विचार सांगतात. बाळासाहेबांचे विचार नौकरी, उद्योग बाहेर जाऊ देणे हे बाळासाहेबांचे विचार नव्हते, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली. मी घरात बसून पण महाराष्ट्र सांभाळला तुम्ही दिल्ली समोर मुजरे करत बसलात. माझ्या सोबत महाराष्ट्र होता. आपल जागतिक कौतुक झाले, ते माझे नाही महाराष्ट्राचे कौतुक होते. गुजरातच्या निवडणुका म्हणून महाराष्ट्रातले उद्योग तिकडे पाठवले.
देशद्रोही कसे म्हणता? :तुटलेल्या एसटीवर गतिमान महाराष्ट्राची जाहीरात करतात. सुविधा नाहीत याची यांना शरम वाटत नाही. महाराष्ट्र हे माझे कुटुंब, म्हणूनच माझे कुटुंब माझी जबाबदारी आहेच. ज्या गतीने तुम्ही कुटुंब बदलले तो गतिमान महाराष्ट्र नकोय, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे म्हणाले की, राजन साळवींचा छळ सुरु आहे, ते देशद्रोही नाहीत. राजन, वैभवची काय संपत्ती आहे? यांच्या मागे का लागता. तसेच देशद्रोही कसे म्हणता? मग सारवासारव करतात. १९९२-९३ साली मुंबई वाचवणारे यांना देशद्रोही वाटतायत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.