रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या बारसू येथील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्प गुजरातमध्ये हलवून राज्यात चांगले गुंतवणूक प्रकल्प आणावेत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी म्हटले. बारसू येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना ठाकरे यांनी सरकारला आंदोलकांना तोंड देण्याचे आव्हान दिले.
'वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्रावर लादले जात आहेत' :उद्धव ठाकरे म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू हे ठिकाण प्रस्तावित केले होते. मात्र त्यासाठी आंदोलकांचे डोके फोडणे किंवा लोकांचा विरोध असला तरी रिफायनरी प्रकल्प सुरू झालाच पाहिजे, असे माझा हट्ट नव्हता. बल्क ड्रग्ज पार्क, वेदांत - फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेले आहेत. आता हा रिफायनरी प्रकल्प गुजरातला नेऊन आमचे गेलेले प्रकल्प महाराष्ट्रात आणावेत, असे माझे मत आहे. जे वादग्रस्त नाही ते गुजरातसाठी आणि जे वादग्रस्त आहे ते कोकण आणि महाराष्ट्रावर लादले जात आहे, असे ठाकरे यावेळी म्हणाले.
'प्रकल्प आणण्यापूर्वी स्थानिकांशी संवाद साधला पाहिजे' : दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे आणि त्यांचे बंधू व माजी खासदार निलेश राणे यांनी रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. नीलेश राणे म्हणाले की, ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला पाठिंबा दिला होता, पण ते आता विरोधी पक्षात असल्याने याला विरोध करत आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की, जनतेच्या हिताला बाधा पोहोचेल असा कोणताही विकास प्रकल्प आम्ही राज्यात येऊ देणार नाही. आमच्यात आंदोलकांना तोंड देण्याची प्रामाणिकता आहे. कोणताही प्रकल्प आणण्यापूर्वी सरकारने स्थानिकांशी संवाद साधला पाहिजे.