रत्नागिरी : सत्तांतर नाट्यानंतर आमदार उदय सामंत यांचा शुक्रवारी रत्नागिरी दौरा झाला. या दौऱ्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सामंत यांच्या स्वागताला हजेरी लावणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांना पदावरून हटविण्यात आले आहे. त्या जागी काहींच्या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पण, त्यातही शिवसेनेला पुन्हा एक झटका बसला आहे. सामंत समर्थक बाबू म्हाप यांच्याकडील उपजिल्हाप्रमुख पदाचा पदभार काढून ज्यांच्याकडे हा पदभार देण्यात आला, त्या नवनियुक्त उपजिल्हाप्रमुखांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिला आहे.
प्रकाश रसाळ यांनी यांचा पदभार स्वीकारण्यास नकार : कौंटुंबिक आणि आरोग्याचे कारण देत प्रकाश रसाळ यांनी हा पदभार स्वीकारण्यास नकार दिला आहे. तर काही दिवसांपूर्वी रत्नागिरी तालुका युवा अधिकारी म्हणून निवड झालेल्या वैभव पाटील यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नवीन नियुक्ती झाल्यानंतर काही तासांत शिवसेनेत झालेल्या राजीनामा नाट्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
नवनियुक्त तालुका युवा अधिकारी पाटील यांचाही राजीनामा :माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे उघड समर्थन करणाऱ्या रत्नागिरी तालुका युवा अधिकारी तुषार साळवी यांना पदावर हटवून त्यांच्या जागी मिरजोळे येथील तरुण शिवसैनिक वैभव पाटील यांची नियुक्ती काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. मात्र, 8 दिवसांच्या आताच वैभव पाटील यांनी राजीनामा दिला आहे. कौटुंबिक कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचे पाटील यांनी जिल्हाप्रमुखांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.
उदय सामंत यांच्या दौऱ्यानंतर या घडामोडी घडत असल्याने राजकीय वर्तुळात खमंग चर्चा झडू लागल्या आहेत.
सामंत समर्थकांना हटवून नवीन नियुक्त्या :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे माजी मंत्री आमदार उदय सामंत शुक्रवारी मतदारसंघात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेतील समर्थकांनी पालीसह रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात गर्दी केली होती. त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी दिसत होते. त्यांच्या दौर्यानंतर शिवसेनेकडून सामंत समर्थकांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.