रत्नागिरी- मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, जि. प. सदस्य विक्रांत जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके, जिल्हा परिषद बांधकाम सभापती विनोद झगडे, तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे, उमेश सकपाळ उपस्थित होते.
मंत्री उदय सामंत यांनी घेतली नाराज आमदार भास्कर जाधवांची भेट हेही वाचा - बोगस डिग्री प्रकरण : माझी अन् विनोद तावडेंची चौकशी करा - उदय सामंत
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उदय सामंत आज (सोमवारी) पहिल्यांदाच जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात आज सकाळी त्यांनी सुरुवातीला माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली. त्यानंतर साडेनऊ वाजता सामंत यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ ही भेट झाली.
भास्कर जाधव यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. त्यात उदय सामंत यांनी आपल्या पहिल्या दौऱ्यात भास्कर जाधव यांच्या घरी जात त्यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. जाधव यांची नाराजी दूर करण्यासाठी, तर ही भेट नव्हती ना, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
हेही वाचा - विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार - उदय सामंत
याबाबत भास्कर जाधव यांना विचारले असता, 'उदय सामंत मंत्री झाल्यानंतर ते प्रथमच चिपळूणमध्ये आले आणि प्रथमच चिपळूणमध्ये आल्यामुळे ते मला भेटायला आले. त्यामुळे चर्चेचा काही प्रश्नच उद्भवत नाही. आपल्या घरी आलेल्या माणसाचे आपण स्वागत करणे, ही आपली संस्कृती आहे, संस्कार आहेत. त्या संस्कृती व संस्काराला अनुसरून आम्ही त्यांचे स्वागत केले, यापेक्षा वेगळी काहीही चर्चा झालेली नाही, अशी प्रतिक्रिया आमदार भास्कर जाधव यांनी यावेळी दिली.