रत्नागिरी -कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला आणि सर्वच ठप्प झाले. या लॉकडाऊनमध्ये नेमके करायचे काय? असा प्रश्न अनेकांसमोर उभा ठाकला. रोजगार नसल्याने अनेकांना आर्थिक चणचणही जाणवत आहे. मात्र, रत्नागिरी तालुक्यातील सांडेलागवण येथील दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनमध्ये वेळेचा सदुपयोग करत 7 गुंठे जमिनीत सेंद्रीय पद्धतीने भाजी लागवड केली आहे.
सांडेलागवण गावातील दोन मुलांनी सात गुंठे जागेत फुलवला भाजीचा मळा कोरोनातील लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसांना रोजगार मिळवण्याचे मोठे आव्हान आहे. अनेक मुंबईकर चाकरमानीही गावी परतल्याने बेरोजगारांच्या संख्येत आणखी भर पडली आहे. सांडेलावगणमध्ये 'जग पुस्तकांचे ग्रंथालय' आणि 'फिरत्या वाचनालय संकल्पने'त कार्यरत असलेले राहुल बेनेरे व धनंजय पाष्टे या दोघांपुढेही रोजगाराची अडचण होती. राहुल हा कला शाखेच्या द्वितीय वर्षात आहे तर धनंजय हा तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत. त्यांनी आपल्या अडचणी संदर्भात गावातील ग्रंथालयाचे संचालक प्रसाद पाष्टे यांच्याशी संवाद साधला. त्यातूनच भाजी लागवड करण्याची संकल्पना पुढे आली.
त्यांची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पैशांची गरज लागणार होती. त्यासाठी या तरुणांनी एप्रिल आणि मे महिन्यात आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडे आंबे काढणीचे काम केले. त्यातून मिळालेल्या पैशातून बियाणे, काही अवजारे, सेंद्रिय खते, फवारणीची साधने आणि जाळी असे साहित्य खरेदी केले. त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. धनंजय पाष्टे याच्या पडक्या घराची जागा वापरली जात नव्हती. तसेच नवीन घराजवळही थोडीशी रिकामी जागा आहे. या दोन्ही जागांचा वापर शेतीसाठी करण्याचा धनंजयने निर्णय घेतला. त्याला वडील नथुराम पाष्टे यांनीही संमती आणि सहकार्य दिले.
भाजीपाल लागवडीचा अनुभव या दोघाही मुलांकडे नव्हता मात्र, काम करण्याची इच्छाशक्ती होती. वाटद खंडाळा येथील भाजी व्यावसायिक राकेश वरवटकर व हातखंबा झरेवाडी येथील कृषी विद्यार्थी प्रतीक कळंबटे यांचे धनंजय व राहूल यांनी मार्गदर्शन घेतले. पावसाळ्याच्या सुरुवातीला सेंद्रीय पध्दतीने भाजी लागवड सुरू केली. सात गुंठ्यांत पडवळ, कारले, भोपळा, भेंडी, दोडके, गवार ही पीके घेतली. कोणतीही रासायनिक खते न वापरता केवळ सेंद्रिय खतांवरच त्यांनी हा मळा फुलवला आहे.
सध्या सर्व झाडांना भाज्या येण्यास सुरुवात झाली आहे. श्रावण महिना सुरू आहे, त्यामुळे गावातच भाज्यांची विक्री सुरू आहे. त्यातून त्यांना चांगला मोबदलाही मिळत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना बळ देण्यासाठी अनेक सहकार्याचे हात पुढे आले. पंचायत समिती सदस्या साक्षी रावणंग, संतोष रावणंग, जयवंत बेनेरे, परशुराम पाष्टे, सुरेश पाष्टे, वसंत पाष्टे , विनायक गावडे, आकाश सावरकर, तुषार मांडवकर, प्रणाली बैकर, सोनाली कुरतडकर, साक्षी कुरतडकर, अनिकेत बेनेरे, राजेश पाष्टे, मिथुन पाष्टे, सुयश बेनेरे, रोशन बेनेरे असे अनेकांचे सहकार्य मिळाल्याचे हे दोघेही आवर्जून सांगतात.