रत्नागिरी - सध्या एका माशांच्या व्हिडिओची चर्चा सर्वत्र रंगली आहे. पावसाळ्यात कोकणात चढणीचे मासे खाण्याची पर्वणी असते. हे चढणीचे मासे पकडण्याची एक पद्धत असते. अशाचप्रकारे मासे पकडत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नदीच्या प्रवाहात हजारो मासे पाण्यावर उड्या मारताना दिसत आहेत. मात्र, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पाहूया या व्हायरल व्हिडिओमागील सत्य...
कोकण आणि मासे यांचे एक वेगळे नात आहे. खवय्यांसाठी कोकण नवनवीन माशांची पर्वणी घेवून येत असते. मात्र, पावसाळ्यात मासेमारीवर बंदी असते. संपूर्ण महाराष्ट्रात १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारीवर बंदी असते. त्यामुळे कोकणामध्ये पावसाळ्यात खवय्यांसाठी गोड्या पाण्यातील मासे खाण्याची पर्वणी असते. त्यातही पावसाळ्यात चढणीचे मासे पकडणे म्हणजे कसरतच असते. चढणीचे मासे म्हणजे नदीतले मासे पाण्याच्या प्रवाहाबरोबरवर येतात. त्याला प्रवाहाच्या उलट्या दिशेने येणारे मासे म्हटले जाते. सध्या अशाच माशांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हजारो मासे पकडण्यात आले आहेत. हेच मासे खाण्यासाठी कोकणात या, असा मेसेज या व्हिडिओसोबत व्हायरल होत आहे. त्यामुळे या व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी सागरी जीवसृष्टी अभ्यासक स्वप्नजा मोहिते यांच्याशी ईटीव्ही भारतने चर्चा केली.