रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील वाकेड घाटात मोरी खचल्याने जवळपास दोन तास महामार्ग ठप्प झाला होता. बुधवारी सायंकाळी मुसळधार पावसात महामार्गावर ही घटना घडल्याने महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. रात्री आठनंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.
बुधवारी सायंकाळपासून लांजा तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. या पहिल्या मुसळधार पावसाचा फटका अपेक्षेप्रमाणे महामार्गाला बसला. तालुक्यातील वाकेड घाटीत महामार्गाचे काम जोरात सुरू असून घाटातील डोंगर खुदाईमुळे रस्त्याची गटारे बुजली आहेत. यामुळे मुख्य रस्ता धोकादायक बनला आहे. यातच रस्त्यालगत मातीचे ढिगारे असल्याने मातीही रस्त्यावर येत आहे.
पावसामुळे वाकेड घाटात मोरी खचून मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. दरम्यान, बुधवारी कोसळलेल्या पावसाने पाण्याचा निचरा न झाल्याने वाकेड घाटातील वळणावरील एक मोरी खचली. ही खचलेली मोरी एका वाहनचालकाच्या लक्षात आली म्हणून पुढील फार मोठा अनर्थ टळला. दोन्ही बाजूंनी वाहतूक तात्काळ थांबविण्यात आली. सांयकाळी सहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत ही वाहतूक ठप्प झाली.
अखेर महामार्गाच्या ठेकेदाराची यंत्रणा घटनास्थळी पाचारण करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थांनी याकामी मोलाची भूमिका बजावली. तत्काळ या रस्ता खचलेल्या भागात भराव टाकून रस्ता पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. एका बाजूने लहान वाहने सोडण्यात येत होती. तर मोठी वाहने रस्त्याच्या दुतर्फा थांबविण्यात आली होती. रात्री आठच्या सुमारास खचलेल्या भागाचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर ही वाहतूक सोडण्यात आली.