महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-गोवा महामार्गावर चिखलाचे साम्राज्य; चार तास वाहतूक ठप्प - रत्नागिरी पाऊस इफेक्ट

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे, मात्र ठेकेदाराच्या ढिसाळ कामाचा फटका वाहनचालकांना बसत आहे. रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. रात्री जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निवळी घाटात दरड कोसळली होती. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक चार तास ठप्प झाली होती.

मुंबई-गोवा महामार्गावर चिखलाचे साम्राज्य
मुंबई-गोवा महामार्गावर चिखलाचे साम्राज्य

By

Published : Jun 17, 2021, 11:39 AM IST

रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गावर लवेल-दाभिळ फाटा या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी कल्याण टोलवेज कंपनीच्या माध्यमातून महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र हे काम अजून पुर्ण झालेले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल आणि मोठे खड्डे पडले आहेत. वाहन चालकांना या अर्ध्या किलोमीटर परिसरातून वाहन चालवणे अवघड झाले आहे. दरम्यान भर पावसातच कल्याण टोलवेज कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्याचा फटका बसत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर चार तास वाहतूक ठप्प

भरणे नाका परिसरातही अर्धवट कामामुळे नागरिकांना त्रास

महामार्गाच्या अर्धवट कामामुळे यंदा भरणे नाका परिसरात लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामध्ये अत्यंत ढिसाळपणा झाल्याने यंदा भरणे नाक्याची पावसामध्ये अक्षरशः दैना उडाली आहे. अर्धवट अवस्थेत गटारांची कामे ठेवल्याने भरणे नाका परिसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. येथील रहिवाशांना होणारा त्रास हा केवळ महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे सहन करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.

महामार्गावरील वाहतूक होती चार तास ठप्प

जिल्ह्यात रात्री पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका महामार्गाला बसला आहे. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गवरील निवळी घाटात दरड कोसळली. त्यामुळे माती रस्त्यावर येऊन वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. जवळपास 4 तास ही वाहतूक ठप्प होती. त्यामुळे घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्त्यावर आलेली माती बाजूला करण्यासाठी प्रशासनाकडून रात्री पासून प्रयत्न सुरू होते. अखेर चार तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र या दरम्यान दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

हेही वाचा -रत्नागिरीत मुसळधार, १५ गावांना जोडणारा पालशेत पूल पाण्याखाली

ABOUT THE AUTHOR

...view details