रत्नागिरी- रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे नातुंडेवाडी येथे चिरे (विट) वाहतूक करणारा टेम्पो उलटून अपघात झाला. या अपघातात ट्रकमधील 3 कामगारांचा विटा अंगावर पडल्याने मृत्यू झाला. तर गाडी मालकासह चारजण गंभीर जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. शुक्रवारी (दि. 20 डिसें) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
मृत कामगारांमध्ये अजय अनंत लाखण, सुधाकर कृष्णा लाखण या सख्ख्या चुलत भावांसह गोरक्ष काळे (सर्व रा. शिवार आंबेरे) या यांचा समावेश आहे. तर ओमकार विश्वनाथ खानविलकर, सूर्यकांत गोविंद पाजवे, यशवंत गोसावी, दिलीप नमसले हे चौघे जखमी झाले आहेत.
पावस नजिकच्या मावळंगे नातुंडेवाडी येथून विश्वनाथ खानविलकर यांच्या मालकीच्या टेम्पोमधून विटा भरुन ते मोरया सडा येथे जात होते. यावेळी मार्गावर नातुंडेवाडी जवळ वळणावर चिरे घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आंब्याच्या झाडाची फांदी लागली. झाडाच्या फांदीच्या धडकेने टेम्पो रस्त्यावरून खाली उतरला आणि यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो एकाबाजूला उलटला. त्यानंतर गाडी रस्त्याच्या खाली कोसळली.