रत्नागिरी - कोकण किनारपट्टी भागात आता निसर्ग चक्रीवादळ धडकणार असल्याने जिल्हा प्रशासन देखील सतर्क झाले आहे. हे वादळ गुहागरच्या पुढे सरकले आहे. त्यात जिल्ह्यात रात्रभर पावसाचा जोर आणि सोसाट्याचा वारा आहे. पहाटेपासून वादळी वाऱ्यासह पाऊसही वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील मंडणगड, दापोली आणि गुहागरला चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील वीजपुरवठा देखील खंडीत करण्यात आला असून 9 ते12 या वेळात ताशी 80 ते 90 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या इतर किनारपट्टी भागाचा विचार करता रत्नागिरी आणि राजापूर हा भाग कमी प्रभावित होईल, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला होता. जिल्ह्यात अणखी एक एनडीआरएफची तुकडी तैनात करण्यात आली असून एक तुकडी दापोली तर दुसरी मंडणगड येथे थांबणार आहे.