रत्नागिरी - गणपतीपुळे येथे आज (बुधवारी) सकाळी समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या 3 तरुणांपैकी 1 जण बेपत्ता झाला होता. त्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह 3 वाजण्याच्या सुमारास भांडारपुळे किनारपट्टीवरील स्मशानाजवळ सापडला आहे. सुनील लक्ष्मण दादीमणी, असे या तरुणाचे नाव आहे.
गणपतीपुळे समुद्रात ३ जण बुडाले हेही वाचा -खदानीत बुडालेल्या युवकाला शोधण्यात अखेर यश; अकोल्यातील घटना
सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरहून अंगारकी संकष्टीनिमित्त गणपतीपुळे येथे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी सुनील दादीमणी (31, हनुमान नगर), दत्तात्रय मलप्पा हिवरकर (35, अहिल्या नगर) आणि सदाशिव बसप्पा डफळापुरे (40, हनुमान नगर) हे तिघेजण आले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही बुडू लागले. त्यांनी आरडाओरडा सुरू केल्यामुळे किनाऱ्यावर असलेल्या रोहित चव्हाण, अनिकेत चव्हाण आणि निखिल सुर्वे या तिघांनीही समुद्रात धाव घेत यातील दोघांना वाचवले. मात्र, सुनील हा बेपत्ता झाला. त्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. पण तो सापडला नाही. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह भांडारपुळे किनारपट्टीवरील स्मशानाजवळ आढळला.
हेही वाचा -चंद्रपूर जिल्ह्याच्या तुराना घाटावर मिळाला तिसरा मृतदेह, मुलगी अद्यापही बेपत्ता
अंगारक चतुर्थीनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी गणपतीपुळेत दाखल झाले आहेत. देवदर्शनानंतर अनेक जण पोहण्यासाठी समुद्रात उतरतात. मात्र, स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष आणि अतिउत्साहीपणामुळे अनेक पर्यटक येथे बुडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मंगळवारी सुद्धा बुडणाऱ्या 2 पर्यटकांना वाचविण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा अशीच घटना घडल्यामुळे पर्यटकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी माहिती येथील स्थानिकांनी दिली.