रत्नागिरी - केवळ रत्नागिरीचीच नव्हे तर कोकणचं नाव सांस्कृतिक विश्वात भारतभरात पोहोचवणारा रत्नागिरीतील 'थिबा राजवाडा संगीत महोत्सव' येत्या 24, 25 आणि 26 जानेवारी रोजी होणार आहे. रत्नागिरीतल्या 'आर्ट सर्कल'संस्थेकडून या महोत्सवाचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं. शास्त्रीय संगीताची स्वर्गीय अनुभूती आणि राजवाड्याची भव्यता हा संगम निव्वळ शास्त्रीय संगीत प्रेमींनाच नव्हे तर आबालवृद्धांना मोहात पाडतो. आजपर्यंत आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांनी या महोत्सवाला हजेरी लावलेली आहे. यावेळीही या महोत्सवाला प्रतिभावान कलाकार लाभले आहेत. विदुषी श्रुती सडोलीकर काटकर, पं. उल्हास कशाळकर, पं. सुरेश तळवलकर या जगप्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीने यंदाचा महोत्सव सजाणारच आहे पण नवोदितांच्या उपस्थितीनेही रंगणार असल्याची माहिती आर्ट सर्कलकडून देण्यात आली आहे.
24 जानेवारीला डॉ. कनिनिका निनावे आणि पूजा भालेराव यांच्या भरतनाट्यम नृत्य कीर्तनाने या महोत्सवाचे उदघाटन होणार आहे.
या नृत्यकीर्तन मध्ये सरस्वती सुब्रमण्यम गायन साथ, अतुल शर्मा बासरी साथ, आणि सतीश कृष्णमूर्ती मृदुंग साथ करणार आहेत. नृत्यकीर्तन नंतर लगेचच विदुषी श्रुती सडोलीकर काटकर यांचं शास्त्रीय गायन होणार आहे. अजय जोगळेकर संवादिनी साथ तर मंगेश मुळ्ये तबला साथ करणार आहेत. जयपूर अत्रौली घराण्याच्या अध्वर्यू असलेल्या विदुषी श्रुती सडोलीकर महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप करणार आहेत.