महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महामार्ग अभियंत्यांना पुलाच्या रेलिंगला बांधणे पडले महागात; नगराध्यक्ष वैभव खेडेकरांचे अधिकार गोठवले

नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे व महाडचे उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड यांना दमदाटी करून नवीन जगबुडी पुलाच्या रेलिंगला बांधले होते. याप्रकरणी त्यांचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत.

वैभव खेडेकर

By

Published : Jul 31, 2019, 10:24 AM IST

Updated : Jul 31, 2019, 3:11 PM IST

रत्नागिरी - राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे आणि महाडचे उप विभागीय अभियंता प्रकाश गायकवाड यांना दमदाटी करून नवीन जगबुडी नदीवरील नवीन पुलाच्या रेलिंगला बांधणे खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना चांगलेच महागात पडले आहे. खेडेकर यांचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. खेड पोलिसांचा अहवाल मिळाल्यानंतर जिल्ह्याधिकारी सुनील चव्हाण यांनी ही कारवाई केली. तसेच खेडेकर यांच्याकडे असणारा नगराध्यक्ष पदाचा कार्यभार उपनगराध्यक्षांकडे सोपविण्यात आला आहे.

नगराध्यक्ष वैभव खेडेकर

शनिवारी 29 जूनला नवीन जगबुडी पुलाच्या जोडरस्त्याला मोठमोठी भगदाडे पडल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर आमदार संजय कदम व नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी भरणे नाका येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. दरम्यान वैभव खेडेकर आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी जगबुडी पुलाच्या जोड रस्त्याबाबतच्या निकृष्ट कामाला जबाबदार अधिकाऱ्यांना पुलाला बांधले होते.

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे आणि महाडचे उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड यांना दमदाटी करून नवीन जगबुडी पुलाच्या रेलिंगला बांधले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावेळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून या अधिकाऱ्यांची सुटका केली होती. याप्रकरणी खेडेकर यांना 9 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्यांना 13 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान खेड नगर परिषद आणि खेड पोलिसांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला होता. नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना उपाध्यक्षांकडे विहित पद्धतीने कार्यभार सोपविणे प्रशासकीयदृष्ट्या शक्य नाहीय. त्यामुळे खेड नगर परिषदेचे कामकाज चालविण्यासाठी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार सोपविणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नागरपंचायती, व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 कलम 57 (2) अन्वये नगराध्यक्ष पदाचा कार्यभार उपाध्यक्ष सुनील दरेकर यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला आहे. वैभव खेडेकर हे नगराध्यक्ष पदावर हजर होइपर्यंत उपाध्यक्ष यांनी नगराध्यक्ष पदाची कर्तव्ये पार पाडावीत असा आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला आहे.

दरम्यान वैभव खेडेकर यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे

Last Updated : Jul 31, 2019, 3:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details