रत्नागिरी- भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहर पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचं केंद्र राहणार आहे. कारण खेड शहरानजीकच्या जगबुडी नदीपात्रात कोकणातील सर्वात मोठे क्रोकोडाईल पार्क उभे राहणार आहे. क्रोकोडाईल पार्क व बोटिंगची व्यवस्था करण्यासाठी व त्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यासाठी नगरविकास खात्याकडून नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकल्पाच्या निमित्ताने जगबुडी नदीकिनारी देवणे बंदर परिसरात आमदार योगेश कदम, मेरीटाईम बोर्ड, लघुपाटबंधारे विभाग, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पहाणी केली.
खेडचे सौंदर्य खुलणार
खेड शहरानजीक जगबुडी नदीपात्र आणि परिसराला नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभले आहे. त्यातच मुंबई-गोवा महामार्गावरील होणारे चौपदरीकरण, देवणे येथील नारंगी नदीवर झालेला पुल यामुळे खेड तालुका सौंदर्याने खुलत आहे. शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांच्या सहकार्यातून शहराजवळून वाहणाऱ्या जगबुडी नदी पात्रात बोटिंग, पर्यटकांसाठी विश्रांतीगृह व मगर दर्शनासाठी क्राॅकोडाईल पार्क उभे रहावे यासाठी आमदार योगेश कदम यांनी प्रयत्न सुरू केले होते. या प्रकल्पाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार योगेश कदम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नऊ कोटीचा निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यास हिरवा कंदील मिळाला आहे.