रत्नागिरी -शहरानजिकच्या कसोप येथील सर्वंकष विद्यामंदिर (एसव्हीएम) येथे शनिवारी 'वी आर द वर्ल्ड' या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपकमाद्वारे विद्यार्थ्यांनी पोर्तुगाल, अफगाणिस्तान, चीन, स्पेन, ऑस्ट्रेलिया, इराण, टर्की, यमेन, केनिया या देशांचे सादरीकरण करून उपस्थितांना जगाची सफर घडवली. रत्नागिरीत सर्वप्रथमच याप्रकारचा कार्यक्रम पार पडल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.
हेही वाचा - इंटरनेट एक युद्धक्षेत्र...
लोकल ते ग्लोबल या धर्तीवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमात जगाच्या कानाकोपऱ्यातील विविध देशांची माहिती मिळावी तसेच त्याविषयी ज्ञान मिळावे व प्रत्यक्ष अनुभव हा या मागील हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले. शनिवारी सकाळी कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. प्रवेशद्वारावर पासपोर्ट देऊन उपस्थितांना प्रवेश देण्यात आला. शाळेतील पूर्वप्राथमिक गटातील 3 वर्ग रत्नागिरी, महाराष्ट्र व भारत यांचे सादरीकरण केले. यात रत्नागिरीतील फीशिंग, महाराष्ट्रातील पालखी, वारकरी संप्रदाय व लेझीम तसेच विविध सण यांचे सादरीकरण तसेच भारतातील विविध राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडवणारे नृत्य सादर करण्यात आले. या बरोबरच वेशभूषा, खानपान, कला, साहित्य, क्रीडा, भाषा यांचेही सादरीकरण करण्यात आले. इयत्ता पहिली पासून सातवीपर्यंतचे विद्यार्थ्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यातील विविध देशांचे सादरीकरण केले. यात सर्वप्रथम इयत्ता पहिलीने पोर्तुगाल देश साकारला.