रत्नागिरी -कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडक लॉकडाऊन नंतरही कोरोना रुग्ण कमी झालेले नाहीत. मृत्यूदर देखील कायम आहे. अशा परिस्थितीत ढासळत असलेल्या आरोग्य व्यवस्थेला तीनही जिल्हाधिकारी जबाबदार ठरत आहेत. कोणत्याही प्रकारचे नियोजन न केल्याने कोरोना प्रादुर्भाव रोखणे स्थानिक प्रशासनाच्या हाताबाहेर गेले आहे. त्यामुळे आता तीनही जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाने ताब्यात घ्यावी, असे पत्र माजी खासदार तथा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री श्री. हर्षवर्धन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे सचिव संजीव कुमार यांना पत्र दिले आहे.
'तिन्ही जिल्ह्यात कोविड-19 ची परिस्थिती फारच विदारक'
निलेश राणे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील आणि विशेषकरून मुंबईला जोडल्या गेलेल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड-19 ची परिस्थिती फारच विदारक झाली आहे. कोविड- 19 ची आपत्ती हाताळताना स्थानिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी अपयशी ठरताना दिसत आहेत. हे तीनही जिल्हे भौगोलीकदृष्ट्या लहान असले तरी या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढच होताना दिसत आहे. या तीनही जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आणि संचारबंदी लावली गेली आहे. त्यानंतरही रुग्णसंख्या कमी झालेली नाही, हे स्पष्ट दिसून येते.
'जबाबदारी पार पाडण्यात तीनही जिल्हाधिकारी अपयशी'
ते पुढे लिहितात की, कोविड- 19 सारख्या आपत्तीपासून असलेल्या संकटाला प्रतिबंध करणे, त्याचा धोका कमी करणे अथवा प्रभाव कमी करणे, आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी क्षमता वाढवणे आणि त्याला तोंड देण्यासाठी सुसज्जता वाढवणे, आपत्तीच्या घटनांमध्ये योग्य तो शीघ्र प्रतिसाद देणे, आपत्तीचे गांभीर्य आणि परिणाम ओळखणे, आपत्तीच्या घटनांमध्ये बाधितांसाठी तातडीने मदत देणे, सततच्या व एकत्रित प्रक्रियेसाठी नियोजन व आयोजन करून आणि समन्वय साधत उपाययोजनांची अंमलबजावणी करणे हे खऱ्या अर्थाने आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी यांची जबादारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यात तीनही जिल्हाधिकारी अपयशी ठरले आहेत. असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
तीनही जिल्ह्यांची परिस्थिती
तसेच, रायगड जिल्ह्यात कोविड - 19 पॉझिटिव्ह होण्याचा दर हा 14 ते 17 टक्के आहे. तसेच दररोज 500 ते 700 दरम्यान पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. या जिल्ह्यात आज अखेरीस 2 लाख 80 हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पैकी केवळ 1 लाख 30 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान 3 हजार 200 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्याची परिस्थिती काही वेगळी नाही. जिल्ह्यात दररोज सुमारे 600 पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत 1 हजार 400 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यू दर 3.40 टक्के आहे. सध्या कोविड केअर सेंटर देखील अपुरे असून राज्यात होम आयसोलेशन बंद असतानाही मोठ्या प्रमाणात होम आयसोलेशन केले जात आहे. सध्या जिल्ह्यात 4 हजार 500 अॅक्टिव्ह केसेस आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दररोज 650 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. तर 20 जणांचा मृत्यू होत आहे. आज अखेर 23 हजार 776 रुग्ण कोरोनामुक्त झाले असले तरी सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 889 एवढी आहे.
'कडक लॉकडाऊन, संचारबंदी लागू करून सुद्धा भयावह परिस्थिती'
तिन्ही जिल्ह्यात कडक लॉकडाऊन, संचारबंदी लागू करून सुद्धा भयावह परिस्थिती आहे. याशिवाय या तीनही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या उद्भवलेल्या आपत्तीच्या निवारणासाठी जी उपाययोजना करणे आवश्यक होते ते केलेले नाही. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, स्वच्छता कर्मचारी आदी कर्मचाऱ्यांची उणीव आहे. केवळ कोविड केअर सेंटर उभारली केली. मात्र त्यामध्ये सोयीसुविधांचा अभाव कायम आहे. गेले 7 दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्णतः लॉकडाऊन आहे. तरीही परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापनात कमी पडत असल्याचे स्पष्ट होते आहे. आता कोकणातील या जिल्ह्यात पावसाळा सुरू होत आहे. या गोष्टींकडे लक्ष वेधताना निलेश राणे यांनी पत्रात म्हटले आहे की, पावसाळ्यात साथीचे रोग उद्भवण्याची शक्यता अधिक असते. मागील दोन-तीन वर्षांपासून स्वाइन फ्लू, चिकन गुनिया यांसारख्या आजाराने अनेक रुग्ण दगावले आहेत. आता त्यात कोरोनाची भर पडली आहे. या रोगांची साथ थांबवण्यासाठी जिल्हास्तरावर नियोजन करणे अत्यावश्यक आहे. मात्र तसे तिनही जिल्ह्यांमध्ये झालेले नाही. त्यामुळे पुढील काळात भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून आपण यात व्यक्तिगत लक्ष घालून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ताब्यात घ्यावेत, जेणेकरून गंभीर होत चाललेली परिस्थिती आटोक्यात येईल, यावर त्यांनी जोर दिला आहे.
हेही वाचा -Mumbai Rains पहिल्याच मुसळधार पावसात सायन रेल्वे स्टेशनला नदीचे स्वरूप, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प