रत्नागिरी - सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. सरकार राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत गंभीर नसल्याची टीका त्यांनी केली आहे. ते रत्नागिरीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
अधिवेशन पूर्णवेळ झाले पाहिजे
यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, कोरोनाच्या परिस्थितीबाबत सरकार गंभीर नाही, सरकारने कोरोनाच्या टेस्टिंग बंद करून कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याचा भास निर्माण केला होता. आता तहान लागल्यानंतर सरकार विहिर खोदत आहे. यातून अधिवेशन लवकर गुंडाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, ही बाब योग्य नाही. अधिवेशन पूर्णवेळ झालेच पाहिजे अशी मागणी पडळकर यांनी केली आहे.
राज्य सरकारचा अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न 'हा' शिवसेनेचा रोजचा उद्योग
दरम्यान 'सामना'तून भाजपवर टिका करणाऱ्या शिवसेनेवर भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी निशाणा साधला. भाजपवर टिका करण्याचं कारण काय, राज्य सरकारमध्ये तुम्ही बसला आहात, माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणत, तुम्ही घरात बसून भाजपवर टीका करत आहात. केंद्राने काहीच दिले नाही म्हणत, उटसूट मोदींवर टीका करायची हा शिवसेनेचा रोजचाच उद्योग झाला असल्याचे देखील पडळकर यांनी म्हटले आहे.
सोलापूर विद्यापीठाचे नामकरण का केले नाही?
दरम्यान सोलापूर विद्यापीठाची निर्मीती झाल्यापासून या विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्या, अशी मागणी होत होती. मात्र या मागणीवर महाविकास आघाडी सरकारचे निर्माते गप्प का होते, असा सवाल उपस्थित करत, गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शेवटी फडणवीसांनी या विद्यापीठाचे नामकरण केल्याचंही यावेळी पडळकर म्हणाले.