रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार अपघात होत आहेत. आता जिल्ह्यात पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाला आहे. दापोली हर्णै राज्य मार्गावर आसूद येथे रविवारी दुपारी 3.30 च्या सुमारास ट्रक व मॅजिक प्रवासी रिक्षा यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर उपचार सुरू असताना तीन जणांचा उशिरा रात्री मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
दापोली हर्णे मार्गांवरील आसूद जोशी आळी जवळील एका वळणावर दापोलीतून आंजर्लेकडे प्रवासी वाहतूक करणारी डमडम व दापोलीकडे येणारा ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अनिल (बॉबी) हे त्यांचे मॅजिक प्रवासी रिक्षा ( एम. एच.08.5208) हे दापोलीतून आंजर्लेकडे प्रवासी घेऊन जात असताना त्यांची वाहन आसूद जोशी आळी नजीक असलेल्या वळणावर आले. तेव्हा समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने बाहेरून टर्न मारला. तेव्हा मॅजिक प्रवासी रिक्षा जोरदार ट्रकवर आदळली. ट्रकने प्रवासी रिक्षाला रस्त्याच्या डाव्या बाजूला घासत नेले. हा अपघात एवढा भयानक होता की प्रवासी रिक्षामधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला.
चालकासह क्लीनरला अटकअपघाताची माहिती मिळताच दापोलीचे पोलिस निरीक्षक विवेक आहिरे यांनी पोलीस कर्मचारी व रुग्णवाहीका घेऊन अपघातस्थळी धाव घेतली. या अपघातात अनिल सारंग चालक वय 45 रा. हर्णे, संदेश कदम 55, स्वरा संदेश कदम, 8, मारियम काझी, 64, फराह काझी, 27 सर्व रा. अडखळ यांचा मृत्यू झाला आहे. तर वंदना चोगले (वय 34 रा. पाजपंढरी) ,व मीरा बोरकर (वय 22, रा. पाडले) यांचे उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात निधन झाले, तर सामीया इरफान शिरगांवकर हिचेही निधन झाले आहे. त्यामुळे एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सपना संदेश कदम वय 34, रा. अडखळ, श्रद्धा संदेश कदम, वय 14, रा. अडखळ, विनायक आशा चोगले, रा. पाजपंढरी, भूमी सावंत वय 17, मुग्धा सावंत वय 14, ज्योती चोगले वय 9 रा. पाजपंढरी यांच्यावर उपजिल्हा व खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अपघाताची माहिती मिळताच अडखळ, हर्णे, पाजपंढरी तसेच दापोलीकरांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. अपघात घडताच ट्रक चालक व क्लीनर यांनी अपघात स्थळावरून पळ काढला. दापोली पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.