रत्नागिरी -तौक्ते चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर अनेक ठिकाणी पडझड करुन उत्तरेकडे सरकले. या वादळाने रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक घरे आणि झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल खात्याने तत्काळ पंचनामे करण्याचे काम हाती घेतले आहे. रविवारी दुपारपासून सुरू झालेली पावसाची संततधार सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास थांबली. तर वादळी वाऱ्याने पहाटेला विश्रांती घेतली.
1028 घरांचे नुकसान -
सोमवारी वादळ शांत झाल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत होते. समुद्रही दुपारनंतर काहीसा शांत झाला होता. वादळामुळेमंडणगड तालुक्यात 200 घरांचे, दापोली तालुक्यात 350 घरे, खेड तालुक्यात 30 घरांचे, गुहागर 05 घरे, चिपळूण 65 घरे, संगमेश्वर 102 घरे, रत्नागिरी 200 घरे, राजापूर 32 असे एकूण जिल्ह्यात 1028 घरांचे नुकसान झाले आहे.