रत्नागिरी -सात बाऱ्याच्या उताऱ्यावर नोंद घालण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना दापोली तालुक्यातील केळशी येथील तलाठी प्रभाकर भीमराव सोनवणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
या प्रकरणातील तक्रारदाराने केळशी येथील जमीन घरासह ६ डिसेंबर २०१८ रोजी खरेदी खताने केली होती. खरेदी खताच्या कागद पत्रांप्रमाणे त्या जमिनीची नोंद सातबारा उताऱ्यावर होऊन त्यांचे नाव लागण्यासाठी जमिनीचे खरेदी खताचे पेपर आरोपी तलाठी प्रभाकर सोनवणे याच्याकडे दिले होते. या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदारांनी दापोली तहसीलदार कार्यालय आंजर्ले येथील मंडळ अधिकारी प्रीतम कासारे आणि तलाठी सोनवणे या दोघांची भेट घेतली. यावेळी या दोघांनी १५ हजार रुपयांची मागणी केली. ती रक्कम दिल्याशिवाय तक्रारदार यांचे काम करणार नसल्याचे सांगितले.
यामुळे सदर तक्रारदार यांनी या २६ डिसेंबर २०१९ रोजी लाचेची मागणी केल्याची लेखी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांचेकडे दिली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने २६ डिसेंबर २०१९ रोजी करण्यात पडताळणी कारवाईमध्ये तक्रारदाराने खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर त्याच्या नावाची नोंद करण्यात आली. त्यांनतर लाच स्वरुपातील १५ रुपयांची मागणी ही तडजोडीअंती १० हजार रुपयापर्यंत स्वीकारण्याचे आरोपीने मान्य केले.