रत्नागिरी -मतदानाला २ दिवस उरले असतानाच शिवसेनेने मास्टर स्ट्रोक मारत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. स्वाभिमानच्या जिल्हाध्यक्षांसह २ तालुकाध्यक्ष आणि विविध सेलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्वाभिमानाला अखेरचा जय महाराष्ट्र करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. खासदार विनायक राऊत, आ. सदानंद चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. या प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
रविवारी महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष मेघना शिंदे, गुहागर तालुकाध्यक्ष राजेंद्र साळवी, खेड तालुकाध्यक्ष सचिन घाडगे आदींनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, चिपळूणचे तालुकाध्यक्ष प्रताप शिंदे, बाळा कदम आदी उपस्थित होते.
राणेंच्या स्वाभिमानला दणका, जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे यांचा शिवसेनेत प्रवेश शिवसेनेत प्रवेश केलेल्या मंगेश शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, शिवसेनेत यायला थोडा उशीर झाला. गेली १० वर्ष प्रामाणिकपणे काम केले. मात्र, आम्हाला जी वागणूक दिली ती चुकीची होती. निवडणूक काळात तरी चांगली वागणूक मिळेल असे वाटत होते. मात्र, पगारी नोकरांना आम्ही संपर्क करायचा आणि त्यांच्याकडून ऐकून घ्यायचे हे किती दिवस चालणार. आम्ही नारायण राणे यांच्याकडे बघून शांत होतो. मात्र, आमचा भ्रमनिरास झाला.
शिंदे पुढे म्हणाले की, उमेदवार हे आहेत, पण गेल्या १५ दिवसांत निलेश राणेंचा एकही फोन नाही. मी फोन केले तर उचलत नाहीत. तसेच वर्षांत एकही काम यांनी केले नाही. त्यामुळे आम्ही लोकांकडे कुठल्या तोंडाने मत मागायला जायचे. काही दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये आलेल्या निलेश राणे यांनी, 'माझ्या मांडीला मांडी लावून बसणारे लांब गेले, बघून घेतो', असे वक्तव्य केल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. हे वक्तव्य जिव्हारी लागल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. त्यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.