रत्नागिरी-कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास 'एनआयए'कडे देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली. मात्र, शरद पवारांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. यातून शिवसेना आणि राष्ट्रवादीत धुसफूस पहायला मिळाली होती. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये समन्वय आहे, असे प्रतिपादन खासदार सुनिल तटकरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केले.
ईटीव्ही भारतशी बोलताना खासदार सुनिल तटकरे... हेही वाचा-लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला...वरमाईसह चार जणांचा मृत्यू
महाविकासआघाडीचे सरकार टिकणार नाही, असे भाजपकडून वारंवार सांगितले जात आहे. यावर बोलताना तटकरे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडीचे सरकार 171 संख्याबळासह मजबूत आहे. आमचा पाच वर्षांचा कार्यकाळ आम्ही पूर्ण करू. आमच्या सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा विसंवाद नाही.105 जागा मिळाल्यानंतर आम्हीच सत्तेत बसणार अशा स्थितीपर्यंत भाजप पोहचला होता. मात्र, तो सत्तेपासून दूर गेला. त्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या मनातली अस्वस्थता त्यांच्या वक्तव्यांमधून दिसत आहे,अशी खोचक टीकाही त्यांनी भाजपवर केली.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप मध्यावधी निवडणुकांची तयारी करत आहे, असे म्हटले होते. मात्र, मध्यावधी निवडणुकांची सुतराम शक्यता नाही, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.