रत्नागिरी - जिल्ह्यात २ जूनपासून कडक लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते, मात्र नागरिकांना ४८ तास आधी कल्पना द्यावी व त्यांना किराणा व अन्य अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी संधी मिळावी म्हणून ३ जूनपासून कडक लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज दिले. हा लॉकडाऊन ३ ते ९ जून या कालावधीत राहील, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
काय बंद काय सुरू
1. मेडिकल दुकाने, आरोग्य विषयक सेवा व आरोग्य विषयक आस्थापना पूर्णवेळ सुरू राहतील. तथापि, या आस्थापनांमधून खाद्यपदार्थ, किराणा माल, वैद्यकीय नसलेले साहित्य विक्री करण्यास परवानगी असणार नाही. या व्यतिरिक्त किराणा मालाच्या दुकानांसह सर्व प्रकारची दुकाने/आस्थापना पूर्णत: बंद राहतील. केवळ दुध विक्री घरपोच सेवा सकाळी 07.00 ते 11.00 या वेळेत करता येईल.
हेही वाचा -आजपासून यांत्रिक मासेमारी 2 महिने बंद, कोकण किनारपट्टीवर नौका विसावल्या
2. रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा अन्य जिल्ह्यांतून प्रवेश करणे किंवा अन्य जिल्ह्यात प्रवास करण्यास बंद करण्यात येत आहेत. तथापि, केवळ नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी, वैदयकीय उपचारासाठी व कोविड -19 व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक सेवा किंवा निकडीच्या/आणिबाणीच्या प्रसंगी रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करण्यास किंवा रत्नागिरी जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात प्रवास करण्यास मुभा राहील.
जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस 48 तास अगोदर केलेली कोविड-19 निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र/पोलीस विभागाकडील ई-पास सोबत असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
3. सर्व प्रकारची शासकीय व खासगी सार्वजनिक वाहतूक बंद राहील. केवळ आपत्कालीन परिस्थितीत त्यांना प्रवासी वाहतूक करता येईल.
4. सर्व प्रकारच्या बँका/वित्तीय संस्थांचे कामकाज बंद राहील. तथापि, केवळ शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे पीक कर्ज व त्या अनुषंगिक बाबींच्या कामकाजासाठी 10% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 या वेळेत बँका/वित्तीय संस्था सुरू राहतील.