दिवाळीसाठी एसटी सज्ज, जादा फेऱ्यांची घोषणा - ST bus in diwali
कोरोनामुळे गेल्या 6 महिन्यांपासून एसटी बंद होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून एसटी हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दिवाळीनिमित्त एसटी महामंडळामार्फत जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
एसटी बस
रत्नागिरी -कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमधून सावरत असलेली एसटी आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. एसटी दिवाळीसाठी प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. दिवाळीनिमित्त एसटी महामंडळामार्फत जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेत 11 नोव्हेंबरपासून 91 गाड्यांचं नियोजन करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे यावर्षी सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. सध्या लॉकडाऊनचे काही नियम शिथील करण्यात आले असून, वाहतूक व्यवस्थाही हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे लोक घराबाहेर पडू लागली आहेत. दिवाळीनिमित्त मुंबई आणि पुण्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातून चाकरमानी मोठ्या संख्येने गावी येतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा आणि एसटीचे उत्पन्न वाढावे. यासाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. 11 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
असे आहे नियोजन-
- दापोली आगारातून परळी, शिर्डी, अक्कलकोट, गणपतीपुळे, नालासोपारा, चिंचवड, पंढरपूर, नाशिक मार्गावर एकूण 16 फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.
- खेड आगारातून बोरिवली, मुंबई, ठाणे, बीड मार्गावर 8 फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.
- चिपळूण आगारातून परळी, चिंचवड, बोरिवली, बेळगाव, कल्याण, भांडूप, तुळजापूर, पुणे (विश्रांतवाडी), कल्याण‚नाशिक मार्गावर 14 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आलं आहे.
- गुहागर आगारातून अक्कलकोट, मुंबई, कोल्हापूर, चिंचवड, जत, औरंगाबाद, आंबेजोगाई, पंढरपूर मार्गावर 13 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आलं आहे.
- देवरूख आगारातून गारगोटी, तुळजापूर, अक्कलकोट, मालवण, म्हसवड, औरंगाबाद, लातूर, आंबेजोगाई मार्गावर 13फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.
- रत्नागिरी आगारातून लातूर, तुळजापूर, अक्कलकोट, मुंबई, गडहिंग्लज, पंढरपूर, कोल्हापूर, औरंगाबाद मार्गावर 14 फेऱ्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
- लांजा आगारातून पुणे व कोल्हापूर (औरंगाबाद) मार्गावर 4
- राजापूर आगारातून इचलकरंजी, चिंचवड, नगर, शिर्डी, कोल्हापूर, औरंगाबाद मार्गावर 7
- तर मंडणगड आगारातून बोरिवली मिळून एकूण 2 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आलं आहे.
ऑनलाईन आरक्षण उपलब्ध
जादा गाड्यांच्या फेऱ्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. या गाड्यांसाठी ऑनलाईन आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. या जादा फेऱ्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असं आवाहन एसटी प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.