रत्नागिरी- महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले जे पोलीस अधिकारी नक्षलग्रस्त भागात दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा देतात, त्या अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालकांकडून विशेष सेवा पदक जाहीर करण्यात येते. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 2 उपविभागिय पोलीस अधिकारी, 3 पोलीस निरीक्षक, एका सहायक पोलीस निरिक्षकांचा समावेश आहे. तर राज्यातील तब्बल 655 अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवा पदक जाहीर झाले आहे.
नक्षलग्रस्त भागात खडतर सेवा पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे पदक दिले जाते. गेली दोन वर्षे रत्नागिरीत उपविभागिय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले गणेश इंगळे हे यापर्वी नक्षलग्रस्त भागात होते. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती नक्षलग्रस्त भागात करण्यात आली होती. तेथे सुरक्षे बरोबरच नक्षलग्रस्त भागातील ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच त्यांच्या मध्ये एकरूप होत होते. शासनाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ गणेश इंगळे स्थानिकांना मिळवून देत, शासनाबद्दल त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम यांनी केले होते. त्यांच्या या कामाची दखल पोलीस दलाने घेतली आहे.
चिपळूण येथे नव्याने दाखल झालेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनीही नक्षलग्रस्त भागात उत्तम काम केल्याने त्यांच्या कामाची दखल पोलीस दलाने घेतली आहे.