महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 24, 2020, 7:22 PM IST

ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट; यावर्षी आंब्याची निर्यात निम्म्याने घटली, मात्र तरीही निर्यातीत हापूसची बाजी

निर्यातीच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला थेट फायदा मिळवून देणारं पीक म्हणून आंब्याकडे पाहिलं जातं. आंब्याची निर्यात ही जगभर होत असते. दरवर्षी भारतातून 38 ते 40 हजार मेट्रिक टन आंब्याची निर्यात होत असते. यामध्ये हापूसचा वाटा 15 ते 20 टक्के आहे.

mango
आंबा

रत्नागिरी- कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका प्रत्येक क्षेत्राला बसला आहे. आयात-निर्यातीवरही याचा मोठा परिणाम झालेला आहे. मात्र असं असलं तरी यावर्षी जगप्रसिद्ध हापूसने निर्यातीमध्ये चांगली बाजी मारली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी आंबा निर्यात कमी झाली असली, तरी महाराष्ट्रातून जो आंबा निर्यात झाला, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हापूसचा समावेश आहे. कृषी पणन मंडळाच्या कोकण विभागाचे उप सरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील यांनी याबाबत दुजेरा दिला आहे.

कोरोना इफेक्ट ; यावर्षी आंब्याची निर्यात निम्म्याने घटली, मात्र तरीही निर्यातीत हापूसची बाजी

कोकणात आंबा आणि काजूचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र निर्यातीच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला थेट फायदा मिळवून देणारं पीक म्हणून आंब्याकडे पाहिलं जातं. आंब्याची निर्यात ही जगभर होत असते. आंब्याची निर्यात प्रामुख्याने मुंबईतून होते. दरवर्षी साधारणतः भारतातून 38 ते 40 हजार मेट्रिक टन आंब्याची निर्यात होत असते. यामध्ये हापूसचा वाटा 15 ते 20 टक्के आहे. म्हणजेच जवळपास 7 ते 8 हजार मेट्रिक टन एवढी हापूसची निर्यात होते. मध्य-पूर्वेतील देश त्याचबरोबर इंग्लंड तसेच युरोप खंडातील देश अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ कोरिया, जपान या देशांमध्ये आंब्याची निर्यात होते. पण प्रामुख्याने मध्य पूर्व देशांमध्ये आंब्याची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते.

यावर्षी मात्र कोरोनाचं ग्रहण आंबा निर्यातीलाही लागलं. हवाई वाहतूक गेले 2 महिने पूर्णतः बंद आहे. त्यामुळे हवाईमार्गे ज्या देशांमध्ये आंबा निर्यात व्हायचा, त्या देशांमध्ये यावर्षी आंबा निर्यात होऊ शकला नाही. त्यामुळे यावर्षी जी निर्यात झाली ती मध्यपूर्व देश तसेच युरोपमध्ये समुद्रमार्गे झाली. गेल्यावर्षी 1 एप्रिल ते 19 मे 2019 मध्ये या कालावधीत महाराष्ट्रातून आंब्याची निर्यात 16 हजार 746 मे. टन झालेली होती. यावर्षीचा विचार केला, तर 1 एप्रिल 2020 ते 19 मे 2020 या कालावधीत 8 हजार 640 मे. टन आंब्याची निर्यात झालेली आहे. आंबा निर्यात जरी गेल्या वर्षीच्या तुलनेत 52 टक्के झालेली असली, तरी या निर्यातीत हापुसचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे.

गेल्यावर्षी मुंबईमधून जो आंबा निर्यात झाला, त्यामध्ये हापूस व्यक्तिरिक्त केसर, बेंगनपल्ली, तोतापुरी, बदामी या इतर राज्यांमध्ये उत्पादित झालेल्या आंब्याचा सुद्धा समावेश होता. पण यावर्षी मुंबईतून आंब्याची जी निर्यात झाली ती प्रामुख्याने हापूसचीच झाली आहे. यावर्षी इतर राज्यांमधून आंबा मुंबईत पोहोचण्यात अडचणी येत होत्या. लॉकडाऊनमुळे राज्यांच्या सीमा बंद होत्या. बाजार समित्याही बंद होत्या. त्यामुळे निर्यातदारांना इतर राज्यातील आंबा सहज उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे यावर्षी मुंबईतून जी निर्यात झाली, त्यामध्ये हापूसचाच वाटा मोठा असल्याची माहिती कृषी पणन मंडळाच्या कोकण विभागाचे उप सरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील यांनी दिली आहे. तसेच ही निर्यात प्रामुख्याने मध्यपूर्व देशांमध्ये तसेच युरोपमध्ये सुद्धा समुद्रमार्गे झाली असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे यावर्षी आंब्याची निर्यात जरी घटली असली, तरीही निर्यातीत हापूसनेच बाजी मारल्याचं दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details