रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावर आता 'स्पेशल क्लोन ट्रेन' धावणार आहे. एर्नाकुलम ते ओखा दरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेससारखी त्याच मार्गावर दुसरी ट्रेन धावणार असल्याने या गाडीला रेल्वेने 'क्लोन स्पेशल गाडी' म्हटले आहे.
असे आहे वेळापत्रक -
कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार एर्नाकुलम जंक्शन ते ओखा दरम्यान साप्ताहिक धावत असलेल्या सध्याच्या गाडीसारखीच दुसरी गाडी (06438/37) धावणार आहे. 14 फेब्रुवारीपासून 25 एप्रिलपर्यंत ही गाडी एर्नाकुलमहून दर रविवारी सायंकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी सुटणार आहे. गुजरातमधील ओखा स्थानकावर ती तिसऱ्या दिवशी सायंकाळी 4 वाजून 40 मिनिटांनी पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी (06437) ओखाहून 17 फेब्रुवारीपासून 28 एप्रिलपर्यंत दर बुधवारी सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी एर्नाकुलमला पोहोचेल.
असा असेल मार्ग -
ही गाडी दोन थ्री टायर वातानुकूलित, स्लीपर 11, सेकंड सीटिंग 4 तर एसएलआर दोन अशा 19 डब्यांसह धावणार आहे. संपूर्ण प्रवासात ही गाडी सुरतकल, उडपी, कुंदापुरा, मुकांबिका रोड, भटकल, होनावर, कारवार, मडगाव, थीवी, कणकवली, रत्नागिरी, माणगाव ही स्थानके घेत पणवेल, वसई रोड, वापी, सुरतमार्गे गुजरातमधील ओखापर्यंत धावणार आहे.
काय असते 'क्लोन ट्रेन' -
कोणत्याही ओरिजनल ट्रेनच्या नावाची व त्याच मार्गावर धावणाऱ्या दुसऱ्या ट्रेनला 'क्लोन ट्रेन' असे म्हणतात. प्रवाशांची मागणी आणि गरज पाहता, असा गाड्या चालवल्या जातात. या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना अनेक सुविधा मिळतात. ओरिजनल ट्रेनच्या तुलनेत या गाड्यांचा वेग जास्त असतो आणि थांबे कमी असतात. क्लोन ट्रेनने प्रवास करण्यासाठी प्रवासाच्या 10 दिवस अगोदर रिझर्वेशन करावे लागते. भारतात आतापर्यंत २० मार्गांवर क्लोन ट्रेन धावल्या आहेत.