रत्नागिरी - निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील 1250 पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या मदतीला राज्यातील इतर 600 पोलीस कर्मचारी आहेत. तसेच 1300 होमगार्ड आणि सेंट्रल आर्म पोलीस फोर्सच्या पाच तुकड्या तैनात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.
लोकशाहीच्या उत्सवात पोलीस महत्त्वाची भूमिका बजावतात. रत्नागिरी जिल्ह्यात लोकसभा निवडणूक शांततेत पार पडली होती. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणूक देखील जिल्ह्यात शांततेत पार पडेल, असा विश्वास डॉ. प्रवीण मुंढे यांनी व्यक्त केला. 90 पेक्षा जास्त रुटमार्च काढण्यात आले. तसेच महत्वाचे गुन्हेगार किंवा रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे. काहींना तडीपार करण्यात आलेले आहे. एकूणच आम्ही केलेल्या नियोजनामुळे कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची खात्री आहे, पण अनुचित प्रकार घडवण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.