रत्नागिरी - जिल्हा वार्षिक योजना 2020-2021 साठीचा 69 कोटी 63 लाखांचा आराखडा आज येथील अल्पबचत सभागृहात पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर एकूण आराखड्याच्या रकमेत कपात करुन यंदा 33 टक्के व नियतव्यय प्राप्त होणार आहे.
सुरुवातीला मागील वर्षी असणाऱ्या 200 कोटी 86 लाख रुपयांच्या नियतव्ययाचा आढावा घेण्यात आला. मंजूर नियतव्ययाच्या रकमेपैकी 200 कोटी 19 लक्ष रुपये यंत्रणांना वितरित करण्यात आले होते. यापैकी 98.39 टक्के म्हणजेच 197 कोटी 65 लक्ष रक्कम खर्ची पडली असल्याची माहिती सभेस देण्यात आली. पुनर्नियोजनात कोव्हीडची स्थिती पाहून मार्च अखेर 8 कोटी रुपये रक्कम आरोग्य विभागाला देण्यात आली होती. 2019-20 च्या आराखडयात आरोग्य विभागाला 29.34 कोटी नियतव्यय मंजूर होता. या विशेष रकमेनंतर आरोग्य विभागाला कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी एकूण आराखडयाच्या 18.67 टक्के अर्थात एकूण 37.34 कोटी रक्कम प्राप्त होवू शकली.
2019-20 च्या आराखडयात पुनर्नियोजनात जनसुविधेसाठी 28 कोटी 30 लक्ष रुपये तर नगरोत्थान साठी 15 कोटी 50 लाख आणि प्राथमिक शाळांसाठी 12 कोटींचा निधी देण्यात आला होता. यातील कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. वित्त विभागाच्या निर्देशानुसार आराखडयापैकी केवळ 33 टक्के नियतव्यय प्राप्त होणार आहे. हे लक्षात घेऊन कार्यान्वयीत यंत्रणांनी दायित्व कमी करुन त्याबाबत उपाय योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
2020-21 च्या आराखड्या्त कपातीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावित रकमेपैकी 25 टक्के रक्कम कोविड 19 च्या प्रादुर्भावावर उपाययोजना आणि आरोग्य विषयक बाबींवर खर्च करण्याच्या सूचना आहेत. प्रस्तावित कपातीनंतर आरोग्य यंत्रणेसाठी 8.5 कोटी रुपये रक्कम मिळण्याचेही या आराखडयात प्रस्तावित आहे. यासोबतच विशेष घटक योजनेचा आराखडा 5.87 कोटी रुपये राहणार आहे. 2020-21 मध्ये या अंतर्गत 15.39 कोटी देण्यात आले होते. त्यापैकी 88.85 टक्के रक्कम खर्ची पडली आहे.