रत्नागिरी -सचिन वाझे प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांनी युवासेना सरचिटणीस वरूण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राणे असा संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. दरम्यान या आरोपांवरून रत्नागिरीतही युवासेनेने आमदार नितेश राणे यांचा निषेध करत नितेश राणे यांचा फोटो असलेला बॅनर पायदळी तुडवला. यावेळी युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी अजिंक्य मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलो. कोरोनामुळे असलेल्या निर्बंधामुळे काही मोजकेच युवासैनिक यावेळी उपस्थित होते.
नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील सगळी काम आदित्य ठाकरे यांच्या गँगलाच का? असा सवाल केला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की आदित्य ठाकरे आणि त्यांच्या मित्र परिवारातील जी काही निवडक मंडळी आहेत, त्यातील डिनो मोरिया आणि वरूण सरदेसाई आणि कदम या तिघांच्या कंपनीला सर्व टेंडर दिली जातात आणि त्यांच्याकडूनच ही कामे केली जातात. त्यामुळे या सरकारची कामे करण्याची जी पद्धत आहे ती संशयाची आहे. खरं तर हा माझा आरोप आहे, की सरकार या सगळ्यांना पाठीशी घालत आहे. त्यात आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांना प्रामुख्याने पाठीशी घालतात. त्याचं कारण असं आहे की, त्यांचे पारिवारिक संबंध आहेत आणि मी जे काल ट्विट केलेलं होतं ते त्याच अनुषंगाने केलेलं होतं.नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते वरूण सरदेसाई यांच्यावरती त्यांनी टीका आणि आरोप केले आहेत की, वरूण सरदेसाई आणि सचिन वाझे यांचे आर्थिक गैरव्यवहार होते. त्यांनी एकमेकांशी भरपूर वेळा संपर्क साधलेला होता आणि त्यांच्या सीडीआर चौकशीची मागणी आम्ही करत आहोत. त्यांची चौकशी एनआयएकडून व्हावी, अशी आमची मागणी आहे. असे नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.