रत्नागिरी -नाणार रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा तापू लागला आहे. या प्रकल्पाचे समर्थन केल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. मात्र, शिवसेनेतील हे प्रकल्प समर्थक आक्रमक झाले असून, सामूहिक राजीनामे दिलेले 23 पदाधिकारी आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांची आज राजापूरमध्ये गुप्त बैठक झाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे समर्थक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची लवकरच भेट घेणार आहेत. रिफायनरी प्रकल्पावरून सध्या शिवसेनेतील दुफळी समोर आली आहे. रिफायनरीचे उघड समर्थन केल्याने सागवे जिल्हा परिषद गटाचे विभागप्रमुख राजा काजवे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली. या कारवाईच्या निषेधार्थ सागवे जिल्हा परिषद गटातील 22 शाखाप्रमुखांसह एका उपविभाग प्रमुखाने सामूहिक राजीनामे दिले आहेत. या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे घेवून शिवसेनेचे राजापूर कार्यालय गाठले होते. मात्र, हे राजीनामे घेण्यास तालुकाप्रमुख हजर राहिले नसल्याचे राजीनामा देण्यासाठी गेलेल्या शिवसैनिकांनी सांगितले. दरम्यान, या घडामोडी घडत असतानाच सागवे जिल्हा परिषद गटातील नुतन विभाग प्रमुख कमलाकर कदम सोडून, सागवे जिल्हा परिषद गटातील इतर सर्व कार्यकारणी बरखास्त करण्यात आल्याची घोषणा तालुकाप्रमुखांनी केली होती. त्यामुळे शिवसेनेतील दुफळी समोर आली होती.