महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत पाचही जागांसाठी शिवसेनेकडून उमेदवारांना 'एबी फॉर्म' - रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ

शिवसेना-भाजप युतीचा निर्णय होण्यापूर्वीच कोकणात शिवसेनेचं 'ठरलं' आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही जागांवर शिवसेनेने लढण्याची तयारी केली आहे.

रत्नागिरीत पाचही जागांसाठी शिवसेनेकडून उमेदवारांना 'एबी फॉर्म'

By

Published : Sep 30, 2019, 7:49 AM IST

रत्नागिरी - शिवसेना रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही जागा लढवणार असून रविवारी पाचही उमेदवारांना मातोश्रीवर एबी फॉर्म देण्यात आले. यामध्ये तीन विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीतून शिवसेनेत येऊन भगवा खांद्यावर घेतलेल्या भास्कर जाधव यांना गुहागरमधून शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. तर दापोली-खेड विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा -शिवसेनेचे सहदेव बेटकर राष्ट्रवादीच्या वाटेवर, तटकरेंची घेतली भेट

रत्नागिरीतून उदय सामंत

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार आणि म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. सामंत यांनी यापूर्वी आमदारकीची हॅटट्रिक मारली आहे. यंदा ते विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज झाले आहेत.

राजापूरमधून राजन साळवी

राजापूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार राजन साळवी यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. राजन साळवी यांच्या विरुद्ध शिवसेनेच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोधाची उघड भूमिका घेत साळवी यांना या मतदारसंघातून उमेदवारी देऊ नये, अशी पक्षप्रमुखांकडे मागणी केली होती. पण पक्षनेतृत्वाने त्यांच्या निवेदनाची फार दखल घेतली नाही. त्यामुळे या विरोधी गटाचा सामना करत साळवी हॅटट्रिक करतात का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हेही वाचा -लोकांनी आता ठरवलंय - खासदार सुनिल तटकरे

चिपळूणमधून सदानंद चव्हाण

चिपळूण विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांच्यावर शिवसेना नेतृत्वाने पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. कठीण परिस्थितीत चव्हाण यांनी गेली 15 वर्षे मतदारसंघ चांगला बांधला आहे. या मतदारसंघातून आजपर्यंत कोणत्याही उमेदवाराला विजयाची हॅटट्रिक मारता आलेली नाही. पण चव्हाण यांना मात्र यावेळी ही संधी आहे.

गुहागरमधून भास्कर जाधव

राष्ट्रवादीचे घड्याळ उतरवत हातात शिवबंधन बांधलेल्या भास्कर जाधव यांच्याकडे राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. राजकारणाची शिवसेनेतून सुरुवात करणारे जाधव दोन वेळा शिवसेनेकडून चिपळूण मतदारसंघातून आमदार झाले होते. मात्र 2004 मध्ये ते काही कारणास्तव शिवसेनेतून बाहेर पडले. 2004 ची निवडणूक त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढवली, मात्र थोड्याफार मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. राष्ट्रवादीने त्यांना पक्षात मानाची पदे देत विधानपरिषदेवरही घेतले होते. त्यानंतर भास्कर जाधव यांनी 2009 आणि 2014 मध्ये गुहागर विधानसभा निवडणूक लढवत विजयश्री खेचून आणत राष्ट्रवादीचा दबदबा निर्माण केला. भास्कर जाधव आता स्वगृही परतले असून शिवसेनेने त्यांना गुहागरमधूनच उमेदवारी दिली आहे. या जागेवर भाजपनेही दावा केला होता. त्यामुळे या मतदारसंघात आता भाजप तसेच कुणबी समाजाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा -रत्नागिरीत रेकॉर्डब्रेक पाऊस! मोडला २०११ चा विक्रम

दापोलीतून योगेश कदम

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव तसेच युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य योगेश कदम यांना यावेळी शिवसेनेने संधी दिली आहे. गेली तीन वर्षे योगेश कदम यांनी मतदारसंघाची नव्याने बांधणी केली आहे. मात्र, योगेश कदम यांना पक्षांतर्गत बंडाळीचा सामना करावा लागणार आहे. कारण माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी रामदास कदम यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details