रत्नागिरी -शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी शब्द दिलेला आहे, त्यामुळे नाणार रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत या परिसरात होणार नाही, तुम्ही निश्चिंत राहा, असा विश्वास आज पुन्हा एकदा शिवसेना नेत्यांनी राजापूरवासियांना जाहीर सभेत दिला. रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका बदललेली नाही, हे सांगण्यासाठी आज राजापूरमधील कात्रादेवी येथे शिवसेना तसेच कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेची संयुक्त जाहीर सभा झाली. यावेळी खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांच्यासह शिवसेना तसेच रिफायरी विरोधी संघटनेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, मी आता या सभेला येत असताना 10.45 च्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितले की, रिफायनरीबाबत लोकांना शब्द दिला आहे, तो मागे घेतला जाणार नाही, हे आश्वस्त करा. मुख्यमंत्री झालो असलो तरी शब्द मागे घेतला जाणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला सांगितले असून कोणत्याही परिस्थितीत हे रिफायनरीचे गाडले गेलेले मढं उकरून काढले जाणार नाही, हे मढं कायमस्वरूपी गाडले गेलेले असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा -रिफायनरीवरून वातावरण तापले, रिफायनरी समर्थकांची सोमवारी जाहीर सभा
काही शिवसेनेचे पदाधिकारी रिफायनरीचे समर्थन करत असल्याच्या मुद्यावर राऊत म्हणाले की, यापूर्वी एका विभागप्रमुखाची हकालपट्टी केलेली आहे. तसेच या प्रकल्पाचे समर्थन करत असलेल्या जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांची पक्षप्रमुखांच्या आदेशाने हाकलपट्टी करत असल्याचे राऊत यांनी यावेळी जाहीर केले. तसेच जो कोणी शिवसैनिक रिफायनरीचे समर्थन करेल तिथे जाऊन पदाधिकाऱ्यांनी त्याचे थोबाड रंगवा, असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिला. एकदा समर्थनासाठी सिंधुदुर्ग आला होतात, तेव्हा सोडलंय आणि जर पुन्हा आलात तर व्हाणेने तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला. तसेच शिवसेनेतील बाकीच्या नाच्या मंडळींना
शहाणे व्हा, असा इशारा देखील राउत यांनी यावेळी दिला..