रत्नागिरी- ज्या पक्षाचे केंद्रात नेतृत्व आहे. अविरत अशी सत्ता ज्यांच्या हातात आहे. त्यांना महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने गावागावात फिरावे लागते, याचाच अर्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी चांगले काम करत आहे. त्या धास्तीपोटी महाराष्ट्रात आपले अस्तित्व टिकावं यासाठी ही जन आशीर्वाद यात्रा सुरू असल्याचा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे. ते आज(सोमवारी) रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते.
भाजपचा स्वप्न भंग झाल्याशिवाय राहणार नाहीखासदार राऊत म्हणाले की, जन आशीर्वाद हा शब्द सुद्धा भाजपने शिवसेनेकडून घेतलेला आहे. त्या शब्दाची चोरी करून जर जन आशीर्वाद यात्रा काढत असतील तर आम्हाला त्याची धास्ती नाही. मात्र महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला जर टक्कर देण्याचे स्वप्न भाजपा बघत असेल तर ते स्वप्न भंग झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका खासदार राऊत यांनी यावेळी केली.
कोकण आणि मुंबईकरिता राणेंचा चेहरा महत्वाचा नाही -दरम्यान राणेंबाबत बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, नारायण राणे हा महत्त्वाचा चेहरा भाजपातल्या काही लोकांसाठी असेल, मात्र कोकण आणि मुंबई करिता तो महत्त्वाचा चेहरा राहिलेला नाही. नारायण राणेंना त्यांची नेमकी जागा काय आहे, हे दाखवण्याचे काम कोकण आणि मुंबईवासीयांना यापूर्वीच केलेले आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि राहील, तो भेदण्याची ताकद नारायण राणे यांच्यासारख्या स्वार्थासाठी बेईमानी करणाऱ्या माणसामध्ये नाही, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
गडकरी साहेबांसारख्या मोठ्या माणसाला शोभत नाही - खा. राऊतकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राबाबत खासदार विनायक राऊत म्हणाले की, गडकरी साहेबांबद्दल आम्हाला खूप नितांत आदर आहे. एखाद्या भागामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाला, तर मुख्यमंत्र्यांना कळविणे, त्यांच्याशी बोलणं हे साहजिकच आहे. मात्र आपण लिहिलेलं पत्र मीडियावर व्हायरल करून त्याची प्रसिद्धी करणं हे गडकरी साहेबांसारख्या मोठ्या माणसाला शोभत नाही. उलट भाजपच्या अनेक ठेकेदारांनी रस्त्यांची कामं कशी सडवली आहेत, आणि लोकांना त्याचा कसा त्रास होतोय, ह्याचा जर अभ्यास केला तर त्याचा ग्राफ खूप मोठा असेल, म्हणून गडकरी साहेबांनी जे पत्राच्या बाबतीत केलं ते योग्य नाही, असे मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले आहे. मंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असे करावे, असे जे सूतोवाच केले आहे ते योग्यच असल्याचेही खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. तसेच लवकरात लवकर राज्य सरकारने औरंगाबादचं नामकरण संंभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूर करून तो केंद्राकडे पाठवावा, असं आम्हाला सर्वांना वाटत असल्याची राऊत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.