रत्नागिरी- निलेश राणे यांच्याकडून सध्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे. यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी देखील निलेश राणे यांच्या वक्तव्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, एकतर ते अभ्यासाअंती बोलत नाहीत. तसेच बऱ्याचवेळेला ते शुद्धीत बोलत नाहीत, अशी जोरदार टीका करत खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच रिफायनरी प्रकल्प होणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेघ असल्याचेही राऊत म्हणाले आहेत.
राणेंना कवडीची किंमत देत नाही..; रिफायनरी होणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेघ - vinayak raut on Nanar refinery
नाणार प्रकल्पावरून माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर जमीन गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणे यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच नाणार रिफायनी होणार नसल्याचेही स्पष्टीकरण राऊत यांनी यावेळी दिले.
रिफायनरी प्रकल्पासाठी चौदाशे एकर जमिनीचे गैरव्यवहार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मावसभाऊ संचालक असलेल्या कंपनीमार्फत झाले आहेत, असा खळबळजनक आरोप भाजपचे नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला होता. त्यांच्या या आरोपाला प्रत्युत्तर देत निलेश राणे यांच्यावर खासदार विनायक राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. निलेश राणे हे कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करून बोलत नाहीत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला आम्ही कधीच कवडीचीही किंमत देणार नाही, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
राऊत पुढे म्हणाले की, दलालांचे आणि भू माफियांचे पैसे बोकांडी बसले आहेत, म्हणून रिफायनरीचा विषय काढला जात आहे. या परिसरात दलालांचे पेव फुटले आहे, या दलालांना रिफायनरी हवी आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्थानिक जनतेच्या सोबत आहेत. त्यांनी तसा शब्द दिला आहे. त्यामुळे रिफायनरी होणार नाही, ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे असे उत्तर खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणे यांना दिले आहे.