रत्नागिरी - कंगना रणौतचे उद्गार हे तिचे स्वतःचे आहेत की, तिच्याकडून भाजपने तिच्याकडून वदवून घेतले आहेत, याचा खुलासा होणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षाने याबाबत खुलासा करावा, असे आवाहन शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केले. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले, असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना रणौतने केले आहे. या वक्तव्यावरुन आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी तिच्यावर टीका केली. (Bhaskar Jadhav On Kangana Ranaut)
याबाबत बोलताना शिवसेना आमदार भास्कर जाधव काय म्हणाले भास्कर जाधव?
देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर जाणाऱ्या क्रांतिकारकांचा अपमान करणाऱ्या कंगना रणौतचे सगळे पुरस्कार काढून घेतले पाहिजेत. तसेच तिच्यावर देशद्रोहाचा खटला भारतीय जनता पक्षाने दाखल पाहिजे. ज्याप्रमाणे विद्यार्थी नेता कन्हैया कुमारवर तुम्ही देशद्रोहाचे खटला टाकला त्याप्रमाणे कंगणा रणौतच्या बाबतीत भाजप सरकार कारवाई करणार का? याचा खुलासा भाजपने करावा, असे आव्हान शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. (Bhaskar Jadhav Criticize Kangana Ranaut)
हेही वाचा -'ते स्वातंत्र्य नव्हते तर भीक होती' कंगनाच्या वक्तव्यावर संजय राऊत आणि वरुण गांधींचा संताप
मागील काळात भाजप एखाद्याच्या कृतीला समर्थन देत नाही. मात्र, त्या व्यक्तीच्या मागे ठामपणे उभे राहते, असे दिसले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली लागवण्याचे वक्तव्य केले होते. यानंतर भाजपने नारायण राणेंच्या वक्तव्याला पाठिंबा नाही. मात्र, नारायण राणेंना पूर्ण पाठिंबा असल्याची भूमिका घेतली होती. तसेच उत्तर प्रदेशमध्ये मंत्र्यांच्या मुलाने शेतकरी आंदोलकांना ट्रॅक्टरखाली चिरडले. याचाही दाखला देत भास्कर जाधव म्हणाले, या दोघांच्याही कृतीचे भाजपने समर्थन केले नाही. मात्र, त्यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याची जाहीर भाषा केली होती. आता देशाच्या स्वातंत्र्यबद्दल निषेधार्ह वक्तव्य करणाऱ्या कंगना रणौतच्या बाबतीतही भाजपने आपली भूमिका देशाला सांगितली पाहिजे, अशी टीका त्यांनी केली.
काय म्हणाली होती कंगना?
भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले', अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रणौतने एका कार्यक्रमात उधळली आहेत. कंगनाच्या या वक्तव्यानंतर देशभरातून तिचा निषेध करण्यात येत आहे. कंगनाला मिळालेले पुरस्कार परत घ्यावेत, अशी देखील मागणी होताना दिसत आहे.