रत्नागिरी -एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप या बाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु आज विस्तार तर बुधवारपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन ( Monsoon session ) घेण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून होणारी टीका टाळत शिंदे सरकार ( Shinde Govt ) अॅक्शन मोडवर आल्याचे समोर येत आहे. तर दुसरीकडे 40 पैकी 8 ते 10 जणांना मंत्रिपद मिळेल, बाकीचे एकमेकांच्या उरावर बसायला मोकळे झाले अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.
शिंदे गटातील आमदार संपर्कात -यावेळी राऊत म्हणाले की आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत असेल, तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. तसेच शिंदे गटामध्ये नाराजी आहे. कारण 40 लोकांना मंत्रीपदाचं आमिष दाखवून शिवसेनेपासून दूर घेऊन गेलेत 40 पैकी 8 ते 10 जणांना मंत्रिपद मिळेल. बाकीचे एकमेकांच्या उरावर बसायला मोकळे झाले अशीही टीका राऊत यांनी यावेळी केली. दरम्यान काही नाराज हे सुरुवातीपासून शिवसेनेच्या संपर्कात आहेत, पण ज्यांना शिवसेनेप्रति विश्वास आहे, अशांना मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत असंही राऊत यावेळी म्हणाले.
टीईटी घोटाळ्यात एका वजनदार मंत्र्याचा हात -दरम्यान जेवढं औट घटकेचं मंत्रिपद मिळेल, त्यामध्ये त्यांनी समाधानी राहावं असा टोला विनायक राऊत यांनी आमदार उदय सामंत यांना लगावला आहे. टीईटी घोटाळा हा केवळ सचिवांनी केलेला नसून, त्यामध्ये एका वजनदार मंत्र्याचा जो हात होता, तो कोणाचा असेल. हे आता अब्दुल सत्तारांच्या मुलीने दाखवून दिलं आहे, असा आरोपही खासदार राऊत यांनी यावेळी केला आहे.