रत्नागिरी -राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरीच्या मुद्यावरून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच शिवसेनेला आणखी एक धक्का मिळाला आहे. रिफायनरी समर्थनार्थ शिवसैनिकांचे 'सोडसत्र' सुरूच आहे. शिवसेनेच्या सागवे विभागातील जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केला. त्याशिवाय शिवसेनेच्या चार माजी शाखा प्रमुखांसह नाणार पंचक्रोशीतील 100 हून अधिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. शिवसैनिकांप्रमाणे राजापूर तालुक्यातील संपूर्ण गोवळ ग्रामपंचायतीने अधिकृतपणे भाजपामध्ये प्रवेश केला. शिवसेनेची सत्ता असलेल्या गोवळ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचासह सर्व सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप महाराष्ट्र राज्य सचिव व रत्नागिरी जिल्हा प्रभारी प्रमोद जठार व दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन व राजापूरचे भाजप तालुका अध्यक्ष अभिजित गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत राजापूरमधील गुरुमाऊली सभागृहात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
शिवसेनेला बालेकिल्ल्यात खिंडार -
राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्पावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. अनेक शिवसैनिक विकासाच्या मुद्द्यावर उघडपणे रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करत आहेत. त्यामुळे अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांवर कारवाईदेखील झाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी राजापूरमधील काही शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. दरम्यान जवळपास दिड वर्षांपूर्वी जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांनी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले होते. त्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली होती. मात्र, तब्बल दिड वर्षानंतर रिफायनरीला विरोध करणाऱ्या शिवसेनेची भूमिका बदलत नाही, हे पाहून आज मंदाताई शिवलकर आणि सागवे, कात्रादेवी, गोठीवरे, घोडेपोई, मिठगवाणे, बुरंबे, गोवळ येथील रिफायनरी समर्थक शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे रिफायनरीच्या मुद्द्यावरून आगामी काळात शिवसेना आणि भाजपमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे.
या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश -