रत्नागिरी - रिफायनरीच्या मुद्यावरून शिवसेनेतील अंतर्गत वाद उफळला आहे. रिफायनरी समर्थन मेळाव्याला गेलेल्या शिवसैनिकांवर कारवाई होणार असल्याचे संकेत शिवसेना कोकण संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी दिले. तर, दुसरीकडे रिफायनरीवरून जिल्हाप्रमुख विलास चाळके आणि आमदार राजन साळवी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे.
रिफायनरीसंदर्भात आमदार राजन साळवी यांनी पक्षाची भूमिका सष्ट करण्याचे आव्हान जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी दिले होते. चाळके यांच्या वक्तव्याचा आमदार साळवी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे समाचार घेतला. जिल्हाप्रमुख विलास चाळके १० वर्षे काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी ते शिवसेनेवर टीका करत होते. आता जिल्हाप्रमुख झाले म्हणून माझ्यासारख्या निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिकाला त्यांनी फुकटचे सल्ले देऊ नयेत. जिल्हाप्रमुखांनी एकहाती काम करण्याची काँग्रेसी पद्धत बंद करावी. अन्यथा त्यांच्या गैर पद्धतीचा अहवाल मातोश्रीवर पाठवेन. वरिष्ठच याबाबतीत निर्णय घेतील. नाणारचा विषय केव्हाच संपला आहे, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे त्याबाबतीत बोलण्याचा प्रश्नच येत नाही, असे साळवी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, या विधानावरून आमदार राजन साळवी अडचणीत आले आहेत. आमदार राजन साळवींच्या या वक्तव्यानंतर वरिष्ठाकडून दखल घेतली गेली आहे. या विषयी साळवी यांना वरिष्ठ जाब विचारणार आहेत, अशी माहिती शिवसेना कोकण संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी दिली आहे. त्यामुळे रिफायनरीच्या मुद्यावरून शिवसेनेतील राजकारण ढवळून निघाले आहे.