रत्नागिरी- यूपीएचे अध्यक्षपद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे द्यावे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या या विधानाचा चिपळूण दौऱ्यावर असलेले युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी समाचार घेतला आहे. शिवसेना अजून तरी यूपीएचा घटक पक्ष नाही, त्यामुळे शिवसेनेने आधी यूपीएमध्ये सहभागी व्हावं, यूपीएचा घटकपक्ष झाल्यावर त्यांनी त्यांची मतं योग्य व्यासपीठावर व्यक्त करावे. तेव्हा त्यांच्या मताचा आदर केला जाईल, अशी प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांंबे यांनी दिली आहे.
'आधी शिवसनेने यूपीएमध्ये यावं'
यावेळी बोलताना तांबे म्हणाले की, 'यूपीएच्या बाहेरच्या व्यक्तीने मतप्रदर्शन करायचे आणि त्यावर आम्ही प्रतिक्रिया का द्यावी.' असा खोचक टोला तांबे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. शिवाय 'शिवसेनेनी यूपीएमध्ये यावे, आपण राज्यात एकत्र आहोत, नंतर त्यांनी योग्य व्यासपीठावर मत मांडावे. त्यानंतर त्याच्या मतांचा आदर केला जाईल. कारण काँग्रेस हा लोकशाहीचा आदर करणारा पक्ष असल्याचेही' यावेळी तांबे म्हणाले. दरम्यान लोकशाही पद्धतीने यूपीएमध्ये चर्चा होतात, आम्ही लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणारे आहोत. त्यामुळे प्रत्येकाच्या मताचा आदर केला जाईल असं सत्यजीत तांबे यांनी यावेळी सष्ट केल आहे.