रत्नागिरी - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत, भाजपात आल्यास त्यांचे स्वागतच असे वक्तव्य केले होते. त्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही लाचार होऊन शिवसेनेशी द्रोह केलात, पण एकनाथ शिंदे शिवसेनेचा खंबीर खांब आहे, असा पलटवार खासदार विनायक राऊत यांनी राणे यांच्यावर केला आहे. ते आज(रविवारी) रत्नागिरीत बोलत होते.
'एकनाथ शिंदे शिवसेनेचा 'खंबीर खांब', सच्च्या शिवसैनिकाची बदनामी करण्याचे राणेंकडून काम' - एकनाथ शिंदे शिवसेनेत नाराज
एकनाथ शिंदे हे शिवसेनेत नाराज असून एक सही करण्यासाठी देखील त्यांना मातोश्रीवर विचारावे लागते, भाजपात आले तर त्यांना घेऊ असे विधान भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. याबाबत बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, बाडगा हा नेहमी जास्त कोडगा असतो, त्याप्रमाणे शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी भाजपने नारायण राणेंचे उभे केलेले हे बुजगावणे आहे.
एकनाथ शिंदे हे शिवसेनेत नाराज असून एक सही करण्यासाठी देखील त्यांना मातोश्रीवर विचारावे लागते, भाजपात आले तर त्यांना घेऊ असे विधान भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. याबाबत बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, बाडगा हा नेहमी जास्त कोडगा असतो, त्याप्रमाणे शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी भाजपने नारायण राणेंचे उभे केलेले हे बुजगावणे आहे. या बुजगावण्याला आम्ही भीक घालत नाही, अशी टीका केली.
तसेच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने काम करत आहेत, अगदी केंद्र सरकारची अडवणूक असताना सुद्धा ते चांगले काम करत आहेत, त्या कामाचं कौतुक देशस्तरावर, जागतिक स्तरावर होत असताना नारायण राणेंना पोटशूळ उठणं साहजिकच आहे. म्हणूनच एकनाथ शिंदेंसारख्या एका सच्च्या शिवसैनिकाची बदनामी करण्याचे काम राणे करत आहेत. सत्तेसाठी पक्षद्रोह करणं, सत्तेसाठी कृतघ्न होणं, हा नारायण राणे यांचा जो स्थायीभाव आहे, त्या दृष्टीकोनातून जर एकनाथ शिंदे यांच्याकडे बघत असतील तर त्यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे असल्याचा टोला खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.
एकनाथ शिंदे शिवसेनेचा खंबीर असा खांब -
एकनाथ शिंदे मंत्रिपदाला न्याय देत असतानाच, पक्षवाढीसाठी जे योगदान देताहेत ते खूपच कौतुकास्पद आहे. तुम्ही लाचार होऊन शिवसेनेशी द्रोह केलात पण एकनाथ शिंदे शिवसेनेचा खंबीर असा खांब असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या उद्देशाने ही जन आशीर्वाद यात्रा काढलेली आहे, त्या यात्रेला नारायण राणे यांच्या सारख्या नौटंकी करणाऱ्या मंत्र्याने स्वतःच्या जल्लोषाचे स्वरूप दिले आहे, अशी टीकाही राऊत यांनी यावेळी केली.