रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील शिवसेना विभागप्रमुखाला नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन चांगलेच भोवले आहे. त्यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. राजा काजवे असे या पदाधिकाऱ्याचे नाव असून, ते सागवे जिल्हा परिषद गटाचे विभागप्रमुख होते. त्यांच्या जागी कमलाकर कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिसूचना रद्द झालेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ शिवसेनेचे अनेक स्थानीक पदाधिकारी सध्या पुढे येत आहेत. त्यात सामना पेपरमध्ये रिफायनरीची जाहिरात आल्याने संभ्रम वाढला होता. त्यात रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणारे शिवसेना पदाधिकारी, काही शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी सिंधुदुर्गात गेले होते. मुख्यमंत्र्यांशी त्यांची भेट झाली नाही. मात्र, त्यांना देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या निवेदनात शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या सह्या होत्या. त्यामध्ये राजा काजवे यांचे नाव सुरुवातीलाच होते.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'सामना'तल्या जाहिरातीबाबत भूमिका स्पष्ट केली होती. ‘शिवसेनेचे धोरण आणि निर्णय मी ठरवतो. ते 'सामना'तून मांडले जातात. जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवत नाहीत, हे मी नमूद करु इच्छितो. जाहिरात आली म्हणजे शिवसेना बदलली असे होत नाही. त्यामुळे 'नाणार नाही होणार' अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली होती. दरम्यान रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत खासदार विनायक राऊत यांनी दिले होते. त्यानुसार पहिलीच कारवाई सागवे जिल्हा परिषद गटाचे विभागप्रमुख राजा दत्ताराम काजवे यांच्यावर करण्यात आली आहे.